पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कामानिमित्त आलेल्या अधिसभा सदस्यांना कर्मचाऱ्यांकडून वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप अधिसभेत करण्यात आला. याबाबत विद्यापीठ प्रशासन संवेदनशील आहे. परंतु, सरसकट सर्व कर्मचारी वाईट नाहीत. त्यामुळे आरोप करताना शहानिशा करावी, असे सांगताना कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना भावना अनावर झाल्या.
ही बाब समजताच विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने अधिसभेत शिरकाव करीत अधिसभा सदस्यांचा निषेध केला. अधिसभेचा दुसरा दिवस सदस्य आणि कर्मचाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. विद्यापीठातील कामचुकार व विद्यापीठाच्या नावाला आपल्या कृतीने गालबोट लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी शिफारस सदस्य डॉ. सुनील लोखंडे यांनी केली. यावेळी लोखंडे यांनी स्वत: मला आणि इतर सदस्यांची कामे वेळेवर होत नसून कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन केले जात असल्याचा आरोप केला.
कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले की, ही बाब सत्य असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. सदस्यांनी याबाबत लेखी स्वरूपात तक्रारी कराव्यात. यापूर्वीच्या तक्रारींनुसार काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परंतु, सर्वच कर्मचारी वाईट आहेत, असे म्हणणे योग्य नाही. या विषयावर वातावरण गंभीर झाल्यानंतर अधिसभा सदस्य डॉ. लोखंडे यांनी प्रस्ताव मागे घेत सभागृहाची माफी मागितली. व्यवस्थापन परिषदेत होणारे ठराव व निर्णय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील, असे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी यावेळी सांगितले.
कर्मचारी संघटनाही आक्रमक…
कर्मचाऱ्यांवरील आरोप-प्रत्यारोप प्रकरण निवळले असतानाच कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगार एकजुटीचा विजय असो, अशी घोषणाबाजी करीत अधिसभेत प्रवेश केला. “तुम्ही पाच वर्षासाठी निवडून आला आहात. आम्ही वर्षानुवर्षे काम करत असल्याने तुम्ही शिकविण्याची गरज नाही’, अशा शब्दात सदस्यांना सुनावले. अधिसभा सदस्यांनी माफी मागितली असून कर्मचारी संघटनेने बाहेर जावे अशी सूचना कुलसचिव पवार यांनी शिष्टमंडळाला केल्यानंतर वातावरण निवळले.