वडकी गावात अनोखा प्रकल्प; उमेद परिवारसह विविध सामाजिक संघटनांचा सहभाग
पुणे – विशेष मुले आणि व्यक्ती यांच्यामध्ये पंचेंद्रियांची जाणीव वृद्धींगत करण्याच्या अनुषंगाने विशेष बागेची निर्मिती करण्यात आली आहे. उमेद परिवार आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे हडपसरपासून 15 किमी अंतरावर वडकी गावात ही बाग बनविण्यात आली आहे.
बौद्धिकदृष्ट्या असक्षम असणारी विशेष मुले, व्यक्ती यांना अनेकदा आवाज, दृश्य, गंध, चव आणि स्पर्श अशा पाच ज्ञानांची अनुभूती घेताना अडचणीचा सामना करावा लागतो. या गोष्टी बागेची निर्मिती करताना लक्षात घेण्यात आल्या आहेत.
या विशेष बागेचे नुकतेच रोटरी डिस्ट्रीक्टचे प्रांतपाल अनिल परमार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. याप्रसंगी रोटेरियन मोहन पालेशा, संतोष मराठे, उमेद परिवाराचे अध्यक्ष रमेश वांद्रे, सचिव राजेंद्र नहार, विश्वस्त सुभाष रावल, प्रवीण छाजेड उपस्थित होते.
नहार यांनी बागेविषयी माहिती दिली. बागेत प्रवेश विनामूल्य असून, सकाळी 10 ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत ही बाग खुली राहणार आहे.
तुळस, कडूनिंब यांसारख्या झाडांच्या पानाद्वारे मुले विविध चवींची अनुभूती घेऊ शकतील. त्याचबरोबर स्पर्श हा घटक लक्षात घेत, बागेत आम्ही विविध प्रकारच्या फरशांचा समावेश केला आहे. त्यामुळे खडतर, थंड, गुळगुळीत असे विविध स्पर्श समजण्यास त्यांना मदत होईल. तर दृष्टी या घटकांच्या अनुषंगाने आम्ही बागेमध्ये फायबर’च्या काही शीट लावल्या आहेत. ज्याद्वारे प्रकाश परावर्तित होऊन रंगांच्या विविध छटा त्यावर दिसतील, असेही नहार यांनी नमूद केले.
अशी असेल बाग
* बागेमध्ये आवाज, दृश्य, गंध, चव आणि स्पर्श यांच्या अनुषंगाने विविध घटकांचा समावेश
* विशेष व्यक्तींना आवाजाची ओळख व्हावी, यासाठी विविध प्रकारच्या घंटा
* मुलांना गंधाची जाणीव व्हावी, यासाठी विविध प्रकारची फुलझाडे
* चवीच्या जाणीवेसाठी तुळस, कडुनिंब यांसारखी औषधी झाडे
* स्पर्शाची जाणीव व्हावी, यासाठी बागेत विविध प्रकारच्या फरशा