पुणे -महापालिकेच्या जुन्या हद्दीसह नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांतील 100 टक्के कचरा संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील सात वर्षे तब्बल 352 कोटी रूपये खर्चून महापालिकेकडून 257 वाहने भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. त्यातील 80 वाहने महापालिकेच्या ताफ्यात सोमवारी दाखल झाली. दरम्यान, 15 वर्षे पूर्ण झाल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची तब्बल 190 वाहने 1 एप्रील पासून भंगारात काढण्यात आली आहे आहेत. त्यामुळे, महापालिकेला या नवीन वाहनांमुळे मोठा दिलासा मिळाला असून, उर्वरीत 165 वाहनेही लवकरच महापालिकेच्या सेवेत दाखल होणार आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त आशा राऊत, महेश डोईफोडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, कार्यकारी अभियंता गणेश उगले, कनिष्ठ अभियंता आशिष कोळगे यावेळी उपस्थित होते.
शहरात दैनंदिन सुमारे 2 हजार 100 मे. टन घनकचरा निर्माण होतो. निर्माण झालेला कचरा महापालिकेमार्फत संकलीत करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते. महापालिकेतर्फे ओला व सुका कचरा संकलनासाठी स्वतंत्र वाहनांचा उपयोग करण्यात येत असून, 100 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. कचरा संकलन प्रक्रीयेसाठी 108 लहान वाहने, 93 ओला कचरा संकलक वाहने आणि सुक्या कचऱ्यासाठी 56 कॉम्पॅक्टर अशी एकूण 257 वाहने भाडेतत्वावर घेण्यात येत आहे. शहरात 25 ठिकाणी या कचऱ्यावर प्रक्रीया करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मानवी हस्तक्षेप कमी होणार
या सर्व वाहनांवर जीपीएस आणि आरएफआयडी उपकरणे बसविण्यात आली असून, वाहनांच्या कामांची नोंद महानगरपालिकेतील नियंत्रण कक्षाद्वारे घेण्यात येणार आहे. या वाहनांवर 7 वर्षासाठी सुमारे 325 कोटी खर्च होणार आहे. सर्व वाहने बीएस-6 प्रदूषण मानांकनाची असून, त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. रिफ्यूज कलेक्टर (ओल्या कचऱ्यासाठीचे वाहन) वाहनाचे कचरा एकत्रित केल्यानंतरचे वजन 14 मे. टन असून कचरा वाहून नेण्यासाठी वाहनावर 7 क्यु. मीटरचा कंटेनर आहे. वाहनावरील हायड्रोलिक यंत्रणेमुळे मानवी हस्तक्षेप कमी होण्यास मदत होणार आहे.