पुणे -महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळकतकर विभागाचे कामकाज 100 टक्के ठप्प झाले आहे. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी हजारो पुणेकर महापालिकेची बिल मिळो अथवा ना मिळो पालिकेच्या तिजोरीत कर जमा करण्यास सुरूवात करतात मात्र, यंदा निवासी मिळकतींना मिळणारी 40 टक्के सवलत, तीनपट शास्ती कर सवलत तसेच देखभाल दुरूस्तीची वजावट म्हणून 10 की 15 टक्के सवलत द्यायची याबाबतचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळात घेतला जाणार आहे. त्यामुळे, या विभागाचे कामकाजच बंद झाले आहे. दरम्यान, आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच दिवसातच पालिकेस 50 कोटींपेक्षा अधिकचा महसूल मिळतो. मात्र, या वर्षी अवघे 8 कोटीच कर जमा झालेला आहे.
बिले नसल्याने काम ठप्प
दरवर्षी महापालिका प्रशासन मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात नागरिकांनी नवीन आर्थिक वर्षाची मिळकतकराची बिले पाठविते. त्यानंतर सर्व मिळकतधारकांना बिलांचा एसएमएस पाठवून त्यात ऑनलाइन बील भरण्याची लिंक पाठविण्यात येते. याशिवाय, नागरिकांना ई-मेल द्वारेही बिले पाठविली जातात. तर महापालिका 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत कर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करात 10 ते 15 टक्के सवलतही देण्यात येत. त्यामुळे या दोन महिन्यातच पालिकेच्या तिजोरीत 500 कोटींपेक्षा अधिक महसूल जमा होतो. नागरिकांना बिलेच न गेल्याने ज्या नागरिकांना शासनाच्या निर्णयाचा काहीच फरक पडणार नाही ते मागील वर्षा प्रमाणेच कर भरत असून, नवीन बीले न आल्याने इतर नागरिकांनी कर भरण्यासाठी वेट ऍड वॉचची भूमिका घेतली आहे.