पुणे- प्रशासकपदाचा कारभार सांभाळताच महापालिका आयुक्तांनी शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सोमवारी सायंकाळी शिवाजी रस्त्यावर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला एक फोन आला. त्यानंतर तब्बल 60 ते 70 जणांच्या पथकाने पहिल्या अर्ध्या तासात अवघा एक सिलिंडर जप्त करत कारवाईचे समाधान मानत पुढचा रस्ता धरल्याचा प्रकार घडला. त्यामुळे अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या कारवाईत हस्तक्षेप सुरूच असल्याचे पुन्हा समोर आले आहे.
शिवाजीरस्ता तसेच बाजीराव रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावरच अतिक्रमणे थाटलेली असतात; तर अनेकांनी दुकानांच्या समोरील पदपथाची जागा हॉटेल तसेच खाद्यपदार्थांच्या पथारीसाठी वापरलेली आहे. शहरात सुरू असलेल्या कारवाईच्या नियोजनानुसार
अतिक्रमण विभागाचे पथक सायंकाळी चार वाजता शनिवारवाड्याच्या समोर शिवाजी रस्त्यावर आले. त्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका खाद्य चौपाटीवर कारवाईसाठी पथक जेसीबी पुढे करून सज्ज झाले.
त्यानंतर पथकातील एका अधिकाऱ्याला फोन आला. त्यानंतर हा फोन जवळपास 10 मिनिटे सुरू होता. त्यानंतर अचानक अतिक्रमण झालेले नसल्याचा साक्षात्कार झालेले पथक माघारी फिरले आणि केवळ 1 सिलिंडर जप्त करून पथक बाजीराव रस्त्याकडे कारवाईसाठी निघून गेले.
आधीच दिली जाते माहिती
या कारवाई आधीच रस्त्यावरील विक्रेत्यांना अतिक्रमण कारवाईची माहिती दिल्याचे आजही समोर आले. पालिकेचे पथक चार वाजता येणार असल्याची माहिती मिळाल्याने रस्त्यावरील अनेक व्यावसायिकांनी आपला बोरिया बिस्तर साडेतीन वाजताच उचलला होता. तर, अनेकजण पथक पुढे जाताच मागे पुन्हा रस्त्यावर विक्रीचा संसार थाटत आपले काम काही झालेच नसल्याच्या आर्विभागात सुरू ठेवताना आढळून आले.