पुणे- करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे, परंतु दुसरा डोस घेण्याची मुदत उलटूनही चालढकल करणाऱ्यांची संख्या तीन लाखांच्या वर झाली आहे. महापालिकेने केलेल्या पाहणीत ही आकडेवारी पुढे आली आहे.
केंद्र आणि राज्यसरकारने लसीकरण पूर्ण करण्याविषयी आदेश दिले आहेत. लसीकरण ऐच्छिक असले तरी सर्व नागरिकांनी ते घ्यावे यासाठी “हर घर दस्तक’ मोहीम सुरू केली आहे. त्या माध्यमातून समुपदेशन केले जात आहे.
यासाठी महापालिकेने पथके नेमली असून, ते घरोघरी जाऊन किती डोस झाले? किंवा कोणी घेतले की नाही, याची माहिती गोळा केली जात आहे. याच माध्यमातून गोळा केलेल्या माहितीत सुमारे तीन लाख जणांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून आले आहे.
या तीन लाख जणांची कोवॅक्सिन घेतलेल्यांची 28 दिवस आणि कोविशील्ड घेतलेल्यांची 84 दिवसांची मुदत उलटून गेली आहे. असे असतानाही त्यांनी लस घेतली नसल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण पुणे विभागातील “हर घर दस्तक’ मोहिमेतून सुमारे 15 लाख जणांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात पुणे शहरातील तीन लाख जणांचा समावेश आहे.
महापालिकेने “हर घर दस्तक’ च्या माध्यमातून लस न घेतलेले आणि दुसरा डोस प्रलंबित असलेल्यांची माहिती गोळा केली आहे, अजूनही करत आहोत. लस ही ऐच्छिक आहे. तरीही नागरिकांनी ती घ्यावी यासाठी आरोग्य विभागामार्फत आपण नागरिकांचे समुपदेशन सुरूच ठेवले आहे. त्याचमुळे सुमारे
13 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
– डॉ. आशीष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका