पुणे – राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) १४ वरिष्ठ अधिव्याख्याता प्राचार्यपदी पदोन्नती देण्यात आलेली आहे. याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (शिक्षण सक्षीकरण शाखा) मधील वरिष्ठ अधिव्याख्याता पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने मान्य केलेल्या निवडसूचीनुसार प्राचार्य, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (शिक्षण सक्षीकरण शाखा) या पदावर अशा सुधारित वेतन संरचनेत ज्येष्ठतेनुसार अटींच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राधा अतकरी (नागपूर), नेहा बेलसरे (पुणे), रत्नप्रभा भालेराव (भंडारा), हर्षलता बुराडे (वर्धा), मिलिंद कुबडे (अमरावती), सुभाष महाजन (रायगड), रत्नमाला खडके (अकोला), इब्राहिम नदाफ (बीड), राजेश बनकर (अहमदनगर), दयानंद जटनुरे (उस्मानाबाद), अनिल झोपे (जळ्गाव), सुशिल शिवलकर (रत्नागिरी), जगराम भटकर ( बुलढाणा), विकास सलगर (परभणी) याप्रमाणे अधिकारी यांना डायटच्या प्राचार्यपदी संधी देण्यात आलेली आहे.
पदोन्नती ही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आलेल्या विशेष अनुमती याचिकांच्या अंतिम निर्णयास अधिन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे स्थित सेवा ज्येष्ठतेनुसार, निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्याबाबत शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार देण्यात येत आहेत. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्णयानुसार रिट याचिकेत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून केवळ तात्पुरत्या स्वरुपात देण्यात येत आहे. पदोन्नती ही विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या सेवाविषयक प्रकरणांच्या निकालाच्या अधिन राहून देण्यात येत आहे.