नवी दिल्ली -भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंग यांच्याविरोधातील भारतीय कुस्तीपटूंचे आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाले आहे. ब्रीजभूषण यांच्याबाबतच्या चौकशीचा अहवाल जाहीर करा व त्यांच्यावर थेट कारवाई करा या मागणीवर आपण ठाम असून तो पर्यंत मागणी मान्य केली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असेही या कुस्तीपटूंनी सांगितले आहे.
ब्रीजभूषण यांनी अनेक महिला कुस्टीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप या कुस्तीपटूंनी केला होता. त्यात भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट व साक्षी मलिकही सहभागी होती. या कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी ऑलिम्पिकपटू बजरंग पुनियाही सहभागी झाला आहे. रविवारपासून राजधानीतीली जंतरमंतर येथे हे आंदोलन सुरू झाले आहे.
तीन महिने पूर्ण झाल्यावरही चौकशी अहवाल जाहीर का केला जात नाही. तसेच ब्रीजभूषण यांच्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई का केली गेली नाही. पोलीस आमची तक्रारही नोंदवून घेत नाहीत. या सगळ्याचा प्रचंड मनस्ताप होत असून त्यासाठीच आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून तेथे तक्रार दाखल केली आहे.
मात्र, जोपर्यंत हा अहवाल जाहीर केला जात नाही व ब्रीजभूषण यांच्यावर थेट कठोर काववाई केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे विनेश फोगटने माध्यमांशी बोलताना सांगितले. ब्रिजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे खेळाडूंची कारकीर्दच धोक्यात आली आहे.