सातारा -सध्या जगभर करोनाच्या संकटामुळे सर्वजण तणावाखाली आहेत. परळी ठोसेघर भागात तर शेतीचा हंगाम उंबरठयावर आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. मात्र, विचलित न होता करोनाचे संकट सुरु राहिले तरी शेतीही पडू द्यायची नाही. आपली स्वत:ची काळजी घेत कुटुंब सावरायचे आहे, असा सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी परळी, ठोसेघर परिसरातील कंटेंनमेंट झोनमधील ग्रामस्थांना दिला. परळी ठोसेघर परिसरातील वाड्यावस्त्या तसेच गावामध्ये खते, बी-बियाणे उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सूचना केल्या.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी परळी, ठोसेघर येथील कंटेनमेंट झोनमधील गावांची पाहणी करून ग्रामस्थ व शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, गटविकास अधिकारी संजय धुमाळ, तालुका वैद्यकिय अधिकारी डी. जी. पवार, विस्ताराधिकारी शंतनु राक्षे, परळीचे वैद्यकीय अधिकारी सचिन यादव, ठोसेघरचे वैद्यकीय अधिकीरी मानसी पाटील, कृषी अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.
परळी भागात 9 गावांमधून 21 करोनाबाधित रुग्ण आढळल्याने भागात एकच खळबळ उडाली होती. ही गावे कंटेनमेंट झोनमध्ये गेल्याने गावातील शेतकरी हवालदील झाले होते. गावात शेतीसाठी बी- बियाणे, खते कशी उपलब्ध करायची, पिकांची औषध फवारणी या समस्या शेतकऱ्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर मांडल्या.
या सर्व अडीअडचणी ऐकल्यावर त्यांनी तत्काळ उपस्थित अधिकाऱ्यांना परळी ठोसेघर परिसरातील वाड्यावस्त्या तसेच गावामध्ये खते, बी-बियाणे उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सूचना केल्या. तसेच करोनाबाधित कंटेनमेंट झोनमधील गावांची माहिती घेतली. जी कुटुंबे शाळेत, मंदिरात मुक्कामी आहेत, त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात. मुंबईवाले आपलेच बांधव आहेत. त्यांचा तिरस्कार करु नका. योग्य खबरदारी घेतली तर हे संकट लवकरच दूर होईल. अशी आशा त्यांनी व्यक्त केली.