जोहान्सबर्ग – भारतीय वंशाचे समाजसेवक आणि “गीफ्ट ऑफ द गिव्हर्स’ या आपत्ती निवारण गटाचे संस्थापक डॉ. इम्तियाज सुलीमन यांना दक्षिण आफ्रिकेचा “साऊथ आफ्रिकन ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी झालेल्या ऑनलाईन मतदानासाठी डॉ. सुलीमन यांना सर्वाधिक नागरिकांनी मतदान केले आहे.
उप सरन्यायाधीश रेमंड झोंडो यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करणाऱ्या “स्टेट कॅप्चर’ या सरकारी आयोगाचे झोडो हे प्रमुख आहेत.
सुलीमन यांनी शुक्रवारी केपटाऊनमधील अल कुद्स मशिदीतील भाषणात जगभरातील मुस्लिमांना इस्लामोफोबिक धारणा बदलण्यासाठी सर्व समुदायांची काळजी घेण्याचे आवाहन केले. तुर्कीमधील मार्गदर्शकांच्या सूचनेवरून डॉ. सुलीमन यांनी 1994 साली “गीफ्ट ऑफ गिव्हर्स’ ही संस्था सुरू केली.
त्यानंतर या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जगभरातील 44 देशांमध्ये मदत आणि स्वयंसेवी कार्य केले जाते आहे. यात प्रामुख्याने भूकंप आणि वादळासारख्या आपत्तींनंतरच्या मदतीच्या कामाचा समावेश आहे. या संस्थेकडून आतापर्यंत 4 अब्ज डॉलरची मदत दुष्काळग्रस्त भागाला उपलब्ध करून दिली आहे.
याशिवाय मध्यपूर्व, पूर्व युरोप आणि आफ्रिकेतील देशांबरोबर पाकिस्तान आणि भारतातील आपत्तीच्यावेळीही या संस्थेने मदत केली आहे.