नगर – राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे महापुरुषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे शहरात संतप्त पडसाद उमटत आहेत. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह विविध सामाजिक संघटनांनी मंत्री पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलने केली. तसेच मंत्री पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
वाचाळवीरांना शिवसेना स्टाईल उत्तर देऊ : कदम भारतीय जनता पार्टीच्या वाचाळवीरांनी राज्याला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र सुरू केले आहे. ज्या राष्ट्र पुरुषांनी महाराष्ट्र घडविला, त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करुन चुकीचा इतिहास लोकांसमोर आणण्याचे उद्योग सुरू आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपुरुषांबाबत केलेले वक्तव्य हा त्यांच्या त्यागाचा अपमान आहे. भाजपाचा हा डाव शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही, त्यांना शिवसेना स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपुरुषांबद्दल केलेल्या बेताल व्यक्तव्याचा शहर शिवसेनेच्यावतीने माळीवाडा येथे जोरदार निषेध करण्यात आला. तसेच मंत्री पाटील यांच्या प्रतिमेवर चिल्लर उधळून आंदोलन करण्यात आले.
..तर मंत्री पाटील यांना शहरात फिरू देणार नाही ः काळे
राज्याचे तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा कॉंग्रेसने जोरदार निषेध केला. शहर जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. चंद्रकांत पाटील नगर शहरात आल्यास कॉंग्रेस कार्यकर्ते त्यांना नगरमध्ये फिरू देणार नाहीत, असा इशारा यावेळी काळे यांनी दिला.
किरण काळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक महाराष्ट्राचा अवमान करत आहे. हा अवमान मनाला अत्यंत वेदना देणारा आहे. यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून पाटील यांनी नाक रगडूनच महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. भारतीय जनता पार्टीकडून जाणीवपूर्वक बदनामीचे षडयंत्र सुरू आहे. कॉंग्रेस याचा तीव्र निषेध करीत आहे.
राष्ट्रवादीने केला मंत्री पाटील यांचा निषेध
राष्ट्रवादी कॉंग्रेसने माळीवाडा येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते म्हणाले की, भाजपचे मंत्री, नेते, पदाधिकारी हे जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करुन महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहे. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मंत्री पाटील यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही : जाधव
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मंत्री राष्ट्रपुरुषांबाबत बेताल वक्तव्य करत आहेत. चुकीचा इतिहास सांगत आहेत. असे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच आवार घालावा, अन्यथा मोठा उद्रेक होईल. या पुढील काळात मंत्री चंद्रकांत पाटील यांना नगर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी दिला. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आला.