वाराणसीतून मोदींविरोधात निवडणूक लढवण्याबाबत प्रियंका गांधी म्हणतात…

वाराणसी – काँग्रेसच्या उत्तरप्रदेश सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी आज वाराणसीतून निवडणूक लढवण्याबाबत वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका गांधी-वढेरा या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तविण्यात येत आहे. मध्यंतरी स्वतः प्रियंका यांनी देखील आपण वाराणसीतून निवडणूक लढवल्यास त्यात काय गैर आहे? असा प्रश्न उपस्थित करत वाराणसीतून निवडणूक लढवण्याबाबत आपण उत्सुक असल्याचेच दर्शवले होते.

अशातच आज प्रियंका यांनी पुन्हा एकदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण तयार असल्याचं म्हंटलं आहे. प्रियंका यांना पत्रकारांनी आपण वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवकडणूक लढवण्यास उत्सुक आहात काय? असा प्रश्न विचारला असता प्रियंका यांनी, “पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी मला वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची अनुमती दिल्यास मी मोठ्या खुशीने वाराणसीतून निवडणूक लढवेन.” असं उत्तर दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रियंका गांधी-वढेरा आणि वाराणसी लोकसभा मतदारसंघ

वाराणसी लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असून येथे १९ मे रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघ हा सातव्या टप्प्यामध्ये असल्याने येथून उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल असणार असून येथील विद्यमान खासदार तथा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाराणसीसोबतच उत्तरप्रदेशातील महाराजगंज, गोरखपूर, कुशी नगर, देवरिया, बंसगाव, घोसी, सेलमपूर, बलिआ, गाझीपूर, चंदौली, मिर्जापुर, रॉबर्ट्सगंज या मतदारसंघांमध्ये देखील सातव्या टप्प्यामध्येच निवडणुका पार पडणार आहेत. अशात काँग्रेसच्या उत्तरप्रदेश सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांची उमेदवारी पक्षातर्फे अद्याप कोणत्याही मतदारसंघातून जाहीर करण्यात आली नसल्याने त्या वाराणसीतून पंतप्रधानांविरोधात निवडणूक लढवतील काय अशी शक्यता अद्याप तरी कायम आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.