ठाणे: रुग्णांना विनाकारण भीती दाखवून रुग्णालयात ऍडमिट करून घेत अव्वाच्या सव्वा बील आकारल्या प्रकरणी दोन खासगी हॉस्पिटलला ठाणे महापालिकेने मोठा दणका दिला आहे. या खासगी हॉस्पिटलला पालिकेकडून तब्बल 16 लाखांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. राज्यातील ही पहिलीच मोठी कारवाई असून यामुळे खासगी रुग्णालयांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांककडून हॉस्पिटल विरोधात तक्रारी येत होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. कोणताही आजार नसताना ठाण्यातील ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या दोन हॉस्पिटल्सनी 13 ठाणेकरांना दाखल करुन घेतले होते आणि त्यांच्यावर 7 दिवस उपचार करुन त्यांच्याकडून लाखोंची बिले आकारली होती. याबाबत ठाणे महानगर पालिकेकडे तक्रार आल्यावर ठाणे महानगर पालिकेने चौकशी करुन या दोन हॉस्पिटलवर कारवाई केली आहे.
अशा प्रकारे नागरिकांची पिळवणूक झाल्यानंतर त्या हॉस्पिटलवर कारवाई होणे ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. यामुळे आता विनाकारण उपचार करणाऱ्यांना चपराक बसण्यास मदत होईल. ठाण्यात या आधीदेखील अशा तक्रारी आल्या होत्या. तसेच थायरो केअर नावाच्या एका लॅबला ठाणे महानगर पालिकेने स्वॅब टेस्ट न करण्याची नोटीस बजाविली आहे. काही लॅबने स्वॅब टेस्ट केल्या होत्या. मात्र त्यांचे अहवाल हे चुकीचे आल्याने नागरिकांना मनस्ताप झाला होता.