पूजा चव्हाण प्रकरणात खासगी खटला दाखल

लष्कर न्यायालय दि. 5 मार्चला देणार पुढील आदेश

पुणे – पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात 18 दिवस उलटूनही कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने आता थेट न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. दाखल केलेल्या खासगी खटल्यामध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून आदेशासाठी 5 मार्च तारीख दिली आहे.

 

 

लीगल जस्टिस सोसायटीतर्फे भक्ती पांढरे यांनी 156 (3) नुसार ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत लष्कर न्यायालयात खासगी खटला दाखल केला आहे. खटल्यानुसार, “पूजा चव्हाण हिचा 7 फेब्रुवारी रोजी अज्ञात कारणामुळे मृत्यू झाला होता. हा मृत्यू संशयास्पद व अनैसर्गिक होता. ती राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये तिचा मृतदेह आढळला होता. पण, याबाबत पोलीस कार्यवाही करत नाहीत. तरुणीच्या संदर्भाने अनेक ऑडिओ क्लिप सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत.

 

 

पूजाच्या संशयास्पद मृत्यूचा तपास होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास मृत्यूबाबतचे पुरावे आरोपींकडून नष्ट करण्याची दाट शक्यता आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना आदेश होणे गरजेचे असल्याचे खटल्यात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात तरुणीची हत्या अथवा आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले आहे. याबाबत पोलीस प्रशासनाबाबत त्वरित तपास होणे आवश्यक होते.

 

 

परंतु, या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासकामात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऍड. ठोंबरे आणि काही वकिलांनी याबाबाबत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यासाठी वानवडी पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. तरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तसदी न घेता उदासीनता दाखवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खटला दाखल करण्यात आला आहे.’

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.