पुणे – महापालिका आवारातील हिरवळीवर बसवण्यात आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अगदी वेळेत पोहोचलेल्या पंतप्रधानांची उपस्थिती ही सगळ्यांना उत्साह देणारी ठरली. महापालिका आवारात आगमन झाल्यानंतर शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, उपमहापौर सुनीता वाडेकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगरसेवक उपस्थित होते.
महापालिका आवारात प्रवेश केल्यानंतर मोदींनी महापालिका आवारातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याचे रिमोट कंट्रोलने अनावरण केले. त्यानंतर त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. उपस्थित नगरसेवकांची भेट घेतली. तेथून ते गरवारे महाविद्यालयाच्या आवारातील मेट्रोच्या उद्घाटनाला गेले.
पुतळ्याचे अनावरण रिमोट कंट्रोल ने केल्यावर ते वेगाने पायऱ्या चढत पुतळ्या पर्यंत पोहोचले आणि त्यांनी पुष अर्पण केले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांच्या डोळ्यांत कौतुक मिश्रित भाव उमटले. तसेच नगरसेवकांना भेटीसाठी गेल्यानंतर उपस्थितांची सेल्फीसाठीची धडपड पाहायला मिळाली.