पुणे: गर्भवती महिलेला शस्त्रक्रियेसाठी चेन्नईला जाणे गरजेचे होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी फक्त एकाच तासात तिचा प्रवास अर्ज मंजूर केला. यामुळे गर्भवतीला अगदी वेळेत चेन्नईला जाता आले.
संबंधित महिलेच्या गर्भाशयात जुळी मुले असून त्यांची नाळ एकच आहे. त्यामुळे त्रास होत असल्याने त्याबाबतची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मात्र, ही शस्त्रक्रिया केवळ चेन्नईत होते.
त्यामुळे पुण्यातून चेन्नईला प्रवास कसा करायचा आणि त्यासाठी आवश्यक पास वेळेत मिळणार का? असा प्रश्न या महिलेला पडला होता. पण, पोलिसांनी कर्तव्यदक्षता दाखवल्याने महिलेला वेळेत उपचार घेणे शक्य झाले. दरम्यान, अल्पावधीत पास मिळवून दिल्याने तिने पुणे पोलिसांचे आभारही मानले. संबंधित महिला लोहगाव विमानतळाहून एअर ऍम्बुलन्सने चेन्नईतील रुग्णालयात दाखल झाली.
कॅन्सरग्रस्त चिमुकल्यालाही दिलासा
कॅन्सरवरील शस्त्रक्रियेसाठी एका 6 वर्षीय मुलाला जयपूरला जाणे गरजेचे होते. त्यालादेखील पोलिसांनी त्वरित पास उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्याला वेळीत उपचार घेणे शक्य झाले. तर, मेंदूचा कॅन्सर असलेल्या 45 वर्षीय व्यक्तीवर उपचार करण्यासाठी डॉक्टर पुण्यात येऊ न शकल्याने संबंधित रुग्णास जयपूरला जाण्यासाठी पास उपलब्ध करून देण्यात आला. नागपूरला जाणे गरजेच्या असलेल्या महिलेलादेखील असाच अनुभव आला.
23,106
वैद्यकीय कारणांसाठी आलेले अर्ज
——-
12, 755
तासाभरात मंजूर अर्ज
—–
वैद्यकीय कारणांचे अर्ज त्वरित मंजूर करण्यास सुरुवातीपासून प्राधान्य दिले आहे. आजार व गरज लक्षात घेता 12 हजार 755 अर्ज एका तासातच मंजूर करण्यात आले. त्यानंतरचे वैद्यकीय अर्ज पुढील चार तासांत देण्यात आले. त्यामुळे या सर्वांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
– बच्चन सिंग, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा
आजार आलेले अर्ज मंजुरीची टक्केवारी
कॅन्सर 6,403 57
आयसीयू 2,741 43
मधुमेह 2,784 49
लहान मुले 1,856 49
गर्भवती महिला 8,433 41
डायलेसिस 3,886 57