पिंपरी चिंचवड – फक्त दिवाळीच नव्हे तर प्रत्येक खरेदी ही स्थानिक दुकानातून किंवा रस्त्यावरील विक्रेत्याकडून करावी, असे मत सर्वच वाचकांनी व्यक्त केले आहे. कारण ऑनलाइन कंपन्यांकडून खरेदी केल्यास त्याचा फायदा परदेशी कंपन्यांना होतो. तर मॉलमध्ये खरेदी केल्यास एकाच कंपनीचा फायदा होतो. आपल्या परिसरातील वेगवेगळ्या दुकानात खरेदी केल्यास सर्वांना आनंद मिळेल. मात्र रस्त्यावरील विक्रेता श्रीमंत होण्यासाठी नव्हे तर पोट भरण्यासाठी विक्री करतो. त्यामुळे त्याच्याकडून साहित्य खरेदी करताना भावात घासाघीस करू नये, अशी भावनाही अनेकांनी व्यक्त केली. तुमच्या खरेदीमुळे त्यांच्या घरात आनंदाचा प्रकाश पसरणार असल्याचे मत अनेक वाचकांनी व्यक्त केले.
देशाच्या विकासाला हातभार लावा
स्थानिक व्यवसाय हा सशक्त करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे हे नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे. स्थानिक बाजारपेठ सशक्त झाल्यास राज्य व राष्ट्राचा विकास होऊ शकतो. परदेशी गुंतवणूक असलेल्या मॉलमध्ये झगमगाटीच्या नादी न लागता स्थानिक बाजारपेठेतच करून देशाच्या विकासात हातभार लावा.
-मनीषा कलशेट्टी, काळभोरनगर
भारतीय रुपया सशक्त करा
दिवाळीच्या काळात परदेशी ऑनलाइन कंपन्यांनी अब्जावधीचे व्यवहार करून कोट्यवधी रुपयांचा नफा कमवला. आपला भारत देश मोठा करण्यासाठी लहान दुकानातून खरेदी करा. परदेशी कंपन्यांमुळे भारतीय रुपया डॉलर्सच्या तुलनेत कमी होत आहे..
-प्रकाश घोळवे,
दिवाळीची खरेदी दिवाळखोरी ठरू नये
दिवाळीची खरेदी करताना पैसे आहेत म्हणून अमिषाला बळी पडून खरेदी करून नये. अन्यथा दिवाळीमध्ये दिवाळखोरी निघालयला वेळ लागणार नाही. शक्य असल्यास अनाथाश्रमाला मदत करून त्यांच्याही चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद आणावा.
-सां. रा. वाठारकर
गल्लीतील दुकानदारच वर्गणी देतो
दहीहंडी, गणपती किंवा नवरात्र उत्सव असला की आपल्या गल्लीतील दुकानदारच मंडळांना वर्गणी देतात. वस्तू, अन्न घरपोहच पाठविणाऱ्या बड्या कंपन्या आपल्या मंडळाला वर्गणी देत नाहीत. त्यामुळे आपल्या परंपरा, संस्कृती टिकवायची असेल तर स्थानिक दुकानदारांकडूनच खरेदी करा.
-ज्ञानेश्वर पुदाले
ऑनलाइन खरेदी भारतीय संस्कृती नाही
ऑनलाईन खरेदी ही आपली भारतीय संस्कृती मुळातच कधीही नव्हती. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशी म्हण कायमच आपल्या मराठी संस्कृती मध्ये रुजवली गेली आहे. त्यामुळे आपल्या मराठी माणसाला मोठे करा.
-प्रमोद येवले, काळेवाडी
“त्या’ ऑफर फसव्या असतात
मोठ्या मॉलमध्ये ऑफर असतात. आपण नकळत तिकडे वळतो. पण खरे तर कोणीही स्वतःचा तोटा करून घेत नाही. कमी किमतीत वस्तू, कपडे विकत नाही. आपण जे गरीब विक्रेते आहेत, जे खरेच प्रामाणिक वस्तू ,माफक किमतीत विकतात, त्यांच्याकडेच खरेदी केली पाहिजे.
-अपर्णा ढोरे, पिंपरी.
ऑफर नको, आनंद पहा
करोनामुळे गेल्यावर्षी रस्त्यावरील नागरिकांना साहित्य विक्री करता आली नाही. आता बहुराष्ट्रीय कंपन्या ऑफर देत आहेत. मात्र या ऑफर न पाहता खरेदी करताना गोरगरीब विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पहा. त्यात तुम्हाला दिवाळीचा
-आनंद दिसेल. सनी गवई
मध्यमवर्गीयांसाठी स्थानिक व्यापारी आधारवड
स्थानिक व्यापारी ग्राहकाचे हित लक्षात घेत काम करत असतो. तो आर्थिक अडचणीत विश्वासाने उधारीवर मालाची विक्री करतो. होतकरू व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी तो आधारवड आहे.
– विशाल गडगे, भोसरी
स्वतः दुकानात जाऊन वस्तू पाहणे, ती हाताळणे, आवडीची वस्तू खरेदी करणे, याचा आनंद ऑनलाइन खरेदीत मिळत नाही. पण दुकानातील गर्दी, पार्किंगचा प्रश्न यामुळे सध्याचे तरुण
-ऑनलाइनकडे वळतात. श्रीकांत चौगुुले
बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या वस्तू खरेदी केल्यास बऱ्याच छोट्या छोट्या कुटुंबांना व त्यांच्या व्यवसायांना चालना मिळेल. त्यामुळे खरेदी करताना शहरातील होतकरू बचत गटांचा विचार करावा.
-मनिषा खेडकर, चिखली
चांगल्या स्थानिक मोठ्या दुकानातून खरेदी केल्यास मालाची खात्री मिळते. तसेच खरेदी केलेल्या वस्तूत काही फॉल्ट असल्यास ती बदलूनही दिली जाते. तसेच प्रदर्शनातून कलात्मक वस्तूची मिळतात. गोरगरीब विक्रेतेही पोटासाठी व्यवसाय करीत असतात.
– सुरेखा वाडेकर, चिंचवड
श्रीमंत व्यक्ती मॉल चालवितात तर ऑनलाइन परदेशी कंपन्या. स्थानिक दुकानदार, फेरीवाले, बचतगट आपल्या परिसरातील असतात. त्यामुळे त्यांच्याकडून फसवणूक होण्याची शक्यता
कमी असते.
– अनिता पाटील, चिंचवड
मध्यमवर्गीयांनी बजेट पाहून खरेदी करावी. छोट्या व्यापाऱ्याकडून खरेदी केल्यामुळे नकळत त्यांना अर्थसाहाय्य मिळू शकेल. त्यामुळे अडचणींच्या चक्रव्युहात सापडलेल्या व्यापाऱ्यांना मदत होईल.
– प्राजक्ता पांढरकर, आकुर्डी
रात्री अपरात्री दुकान उघडून मदत करणारा, सुख-दुःखात सहभागी होणारा, स्थानिक दुकानदाराच असतो. त्यामुळे सहकुटूंब खरेदीसाठी बाहेर पडला आणि स्थानिक बाजारपेठेत चमक आणा.
– साहूल शेख,
तुम्हाला काय-काय आणि कुणासाठी खरेदी करायची आहे, याची यादी बनवा. तुमच्या खिशाला या यादीचा खर्च झेपणार आहे का, हे पहा. खरेदीसाठी प्रदर्शने, तसेच स्ट्रीट शॉपिंगला प्राधान्य द्या. काही वस्तू ऑनलाइन छान वाटत असल्या, तरी त्या प्रत्यक्षात वेगळ्या दिसतात. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊनच खरेदी करा.
– अजित संचेती
जी व्यक्ती चालू-फिरू शकत नाही, अशा व्यक्तींसाठी परदेशात ऑनलाइन शॉपिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अशा व्यक्तींना खरेदीत सवलतही देण्यात येत आहे. त्यांच्या या गोष्टीची आपण सवय लावून घेत आहोत. मात्र आपल्या प्रकृतीसाठी तुम्ही घराबाहेर पडून खरेदी करा आणि बाजारपेठेची शान वाढवा.
– हर्षद देशमुख
स्थानिक दुकानातून खरेदी केली तर कित्येक स्थानिक दुकानदारांची व त्यांच्या परिवारांची दिवाळी आनंदात जाईल. खरा आनंद तोच असतो जो आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला होतो. त्यामुळे स्थानिक दुकानातून खरेदी केलेली केव्हाही योग्य ठरतं.
– गजाला सय्यद
दिवाळी हा बळीराजाचा कृषिसंस्कृतीचा सण आहे. नवे धान्य, डाळी, कपडे, कंदील, पणत्या, लाइटिंग, रांगोळ्या, पूजा साहित्य इत्यादी वस्तूंची खरेदी दिवाळीत होते. गावगाड्यातील बलुतेदार समाजाचे अर्थकारणाला चांगले दिवस दिवाळीत असायचे. ऑनलाइनमुळे कुंभार समाजाला सुद्धा मातीचे दिवे विक्रीसाठी ग्राहकांची वाट बघावी लागतेय.
– मनीषा लाटकर, आकुर्डीगाव
महागाई एकीकडे वाढत आहे. त्यामुळे खरेदी करताना काटकसर करणे गरजेचे आहे. मी छोटे घरगुती व्यावसाय करणाऱ्यांकडून खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहता आला. तुम्ही देखील त्यांच्या आनंदात
सहभागी व्हा.
– भावना क्षीरसागर, रावेत
त्यांचा हेतू श्रीमंत होण्याचा नसतो
दिवाळीचा सणात केरसुणी, पणती, पूजेचे काही साहित्य गरीब, अंध अपंग विकतात. काही लोक त्यांच्याकडे मोलभाव करतात. हा व्यवसाय करण्याच्या पाठीमागचा हेतू त्यांना श्रीमंती होणे नव्हे, तर त्यांचा उदर भरण्याचा प्रश्न असतो. अशा वस्तू मॉलमधून किंवा इतर कुठल्याही दुकानावरून घेण्यापेक्षा या गरजूंकडून घ्या.
– यशवंत कन्हेरे
मराठी नागरिकांकडूनच खरेदी करावी
स्थानिक मराठी नागरिकांकडून दिवाळीची खरेदी करावी. ऑनलाइन खरेदी केल्यामुळे फसवणूक तर होतेच याशिवाय आपला भारतीय पैसा परदेशात जातो. परदेशाची अर्थव्यवस्था बळकटी करण्यास आपणच जबाबदार असतो. भारतीय अर्थव्यवस्था खिळखळी करू पाहणाऱ्या चिनी वस्तू वापरू नयेत. भारतीय वस्तू वापरून आपल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यावी.
-संगीता जोगदंड, नवी सांगवी
मराठी माणसावर अन्याय केल्याची भावना
सण साजरे करताना आपण सर्वांनी जवळील मराठी माणसाच्या दुकानातूनच दिवाळीची खरेदी करावी. यामुळे आपला वेळ आणि बाहेर जाण्यासाठी लागणारे इंधनही वाचेल. आपला पैसा आपल्याच मराठी माणसाकडे गेल्याचे समाधान मिळेल. ऑनलाइन खरेदी केल्यामुळे आपणच आपल्या मराठी माणसावर अन्याय केल्याची भावना निर्माण होईल.
-पूनम फाळके, भोसरी
स्थानिक बाजारपेठेत खरेदी केल्यास देशातील पैसा हा देशातूच राहिल. परदेशात जाणार नाही. यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. यामुळे नागरिकांनी प्रथम देशाचा विचार करून ऑनलाइन खरेदीला नकार द्यावा.
– विश्वास जाधव
मॉलमधून आपण अनेक वस्तू खरेदी करीत असतो. त्यामुळे फक्त एकाच मालकाचा नफा होतो. त्याऐवजी स्थानिक बाजारपेठेतील वेगवेगळ्या दुकानातून खरेदी केल्यास अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायची संधी मिळेल. पुजेचे साहित्यही रस्त्यावरूनच
खरेदी करा. – विलास पाडळे, भोसरी
ऊन असो वा पाउस, विक्रेते दिवसभर रस्त्यावर बसतात. रस्त्यावरील प्रत्येकाकडे ते आशेने पाहततात. त्यांच्या कष्टाला फार किंमत आहे जी शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. तुमच्या खरेदीतील फक्त दहा टक्के खरेदी त्यांच्याकडून करा. मग पहा किती छान दिवाळी साजरी करतात हे विक्रेते.
– किरण जाधव
काही राजकीय पक्षांनी स्थानिक दुकानदारांकडून नागरिकांनी खरेदी करावी, अशी मागणी केली आहे. अशा पक्षांच्या नेत्यांनी स्वतः कृती करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.
– मंगेश भंडारे
आपण स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केली नाही तर आपल्यामुळे कोणाची दिवाळी साजरी झाली नाही, असे होऊ देऊ नका. आपल्या परिसरातील प्रत्येक दुकानदार किंवा रस्त्यावरील विक्रेता यांची दिवाळी तुमच्यामुळे साजरी
झाली पाहिजे.
– शितल पाटील
परदेशी कंपन्यांना सरकारने परवागनीच देऊ नये. कारण भांडवलाच्या जोरावर या कंपन्या एकाचवेळी स्वस्तात भारतीय माल खरेदी करून तो आपल्याच लोकांना विकून मोठा नफा कमवतात.
– यलप्पा वालदोर
मॉलमध्ये खरेदी करताना आपण घासाघिस करतो का, नाही ना? मग रस्त्यावरील गरीब विक्रेत्याकडून खरेदी करताना घासाघीस करू नका. दोन पैसे जास्तीचे मिळाले तर तो श्रीमंत होणार नाही आणि आपणही गरीब होणार नाही.
– शितल नेरकर,
आजकाल ऑनलाइन खरेदी जरी लोकप्रिय होत असली तरी काही वस्तू या अनाथ व बेघर मुलांच्या माध्यमातून तयार केल्या जातात. त्या वस्तूंच्या विक्रीवर त्यांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते.
-भाग्देव घुले, बोपखेल
ज्या ठिकाणाहून खरेदीत आपल्या देशाचा फायदा नाही ती ठिकाणी आपण स्वतःहून टाळावीत. ऑनलाइनपेक्षा स्वतः खरेदी करताना आपण ती वस्तू प्रत्यक्षात पाहू शकतो. त्या वस्तूचा दर्जाही समजतो.
-मेघना टिकेकर
तो ही तुमच्यासारखा होरपळलेला आहे
करोनाच्या काळात अनेकांना आपली दुकाने व व्यवसाय बंद करावे लागले. जे काहीजण तग धरून आहेत त्यांच्याकडे आपण खरेदी करून त्यांना साथ देऊ या. ह्या दुकानदारांना पण एक विनंती की जर एखाद्याने काही पैसे कमी करा अशी विनंती केली तर त्याला पटकन नाही म्हणू नका. तो ही तुमच्यासारखा होरपळलेला आहे हे लक्षात ठेवा.
-प्राजक्ता निफाडकर, निगडी
कोणीच वस्तू मोफत देत नसतो
जर तुम्हाला ऑनलाइन खरेदी करायची असल्यास आणि ऑफर खूपच आकर्षक वाटत असल्यास त्वरित सावध व्हा. कारण, कोणतीही वस्तू कधीच मोफत मिळत नसते, हे नेहमी लक्षात ठेवा. हे फसवणुकीसाठी टाकलेले हे जाळे असू शकते.
-नेहा जोशी, पुनावळे
ऑनलाइनमध्ये वस्तू दिसते एक अन्…
ऑनलाइन खरेदी करून आपण वस्तू खरेदी करून काही वेळा फसवणूक होते. वस्तू फोटोत दिसते एक आणि प्रत्यक्षात आल्यावर असते वेगळीच. अशी फसवणूक टाळण्यासाठी स्थानिक व्यक्तीच्या व्यवसायला प्रोत्साहन दिले पाहिजे. तरच आपल्या परिसराचा विकास होईल.
-मनिषा परांडे
फक्त दिवाळीतच नको
फक्त दिवाळीतच नाही तर इतरवेळीही लहान दुकानदाराकडून खरेदी करावी. ऑनलाइन खरेदी शक्यतो टाळावी. रस्त्यावरील विक्रेत्याशी शक्यतो घासाघीस करू नये.
– राजेंद्र पाटणे, रहाटणी
त्यांच्या सन्मानासाठी एवढे कराच
कोविडच्या काळात प्रियजनांना गमावलेल्या अनेकांनी फराळ, मिठाई, आकाश कंदील’ असे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे अशा लोकांना या काळात मदत करण्यासाठी आपण त्यांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. त्यामुळे ते सन्मानाने उपजीविका चालवू शकतील.
-किरण वडगामा, भोसरी
आपल्या खरेदीमुळे गरीबांच्या घरात दिवाळी
दिवाळी साजरी करताना आपण विचार केला पाहिजे की, आपल्यामुळे एखाद्या गरीब कुटुंबात दिवाळी साजरी होईल. दिवे ऑनलाईन खरेदीपेक्षा मातीचे दिवे लावून साजरी केली तर त्यांनाही दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळेल.
-प्रमोद लांडे, भोसरी
रस्त्यावर साहित्यांची विक्री करणारे स्वाभिमानाने कष्ट करून कुटुंबाचे पालन पोषण करीत असतात. त्यावर त्यांच्या मुलांचे शिक्षण अवलंबून असते. तुम्ही त्यांचे साहित्य खरेदी करावे म्हणून ते उन्हातान्हात बसलेले असतात. त्यामुळे त्यांच्या कष्टाची किंमत करा.
– गौतम इंगळे
स्थानिक बाजारपेठेतून खेरदी केल्यास रोजगारही निर्मिती होईल. हाताला रोजगार मिळाल्यास वाढती गुन्हेगारीही कमी होईल. परदेशी कंपन्यांना श्रीमंत करण्यापेक्षा स्थानिकांच्या हाताला काम द्या.
– मंजिरी सहस्त्रबुद्धे
दिवाळीला आपण नवीन कपडे खरेदी करीत असतो. अशावेळी वापरण्याजोगे घरातील चांगले कपडे जे आपण जास्त वापरत नाही, असे कपडे गरजूंना द्या. तुमच्या स्थानिक खरेदीमुळे त्यांचे घर दिवाळीच्या उजेडाने प्रकाशमान होणार आहे.
– सुनंदा जाधव
खरेदी करणे हा आनंद असतो. दिवाळीची अशा ठिकाणी खरेदी करा जेणे करून ज्यांच्याकडून खरेदी केली आहे त्यांच्या घरी दिवाळी साजरी होईल. कारण आनंद हा वाटल्याने वाढत असतो.
– विशाखा नागोसे
आपण लाखो रुपयांची ऑनलाइन खरेदी केली तरी आपल्या पडत्या काळात ते कधीच उधार देणार नाहीत. स्थानिक दुकानदारच कामाला येऊ शकतो. स्थानिक बाजारपेठेत खरेदी केली तर अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
-सुकन्या वाघेरे
परदेशी कंपन्या श्रीमंत करू नका – इक्बाल मुलानी
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरत आहे. परदेशी कंपन्या ऑनलाइन किंवा मॉलच्या माध्यमातून नफा कमवून तो परदेशात पाठवत आहेत. त्यामुळे दिवाळीची खरेदी स्थानिक दुकानातून करा. परदेशी कंपन्यांना आणखी श्रीमंत करू नका.
शहराचा विकास बाजारपेठांवर अवलंबून – विठ्ठल कळसे
शहराचा विकास बाजारपेठांवर अवलंबून असतो. त्यातून रोजगार निर्मिती होते. पर्यायाने अनेकांच्या जीवनात आनंद फुलतो. त्यामुळे स्थानिक दुकानातून खरेदी करून अनेकांच्या जीवनात आनंद फुलवा.
पुन्हा स्वदेशीचा नारा द्यावा – मजीद शेख,
दिवाळीची खरेदी स्वदेशी वस्तूंची आणि स्वदेशी दुकानातूनच करावी. भारतीय कला-कौशल्यवर्धक वस्तूचा वापर करावा. स्वदेशीमुळे भारतीय बांधवांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच डॉलरच्या तुलनेत रूपयाही मजबूत होईल.