स्टॉलद्वारे हजारो शेतकऱ्यांना विनामूल्य माहिती
रेडा- पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे दुसरे आंतरराष्ट्रीय शेती विषयक प्रदर्शन नुकतेच भरवण्यात आले होते. या आयोजित प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय राज्य पातळीवरील व देश पातळीवरील ऊस शेतीची आधुनिक माहिती या प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी इंदापूर तालुक्यातील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने कंपोस्ट खत, सेंद्रिय खत, साखर उत्पादन, जैविक खते या संदर्भातील अद्ययावत माहिती या स्टॉलद्वारे हजारो शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यामुळे नीरा-भीमा कारखान्याला पुण्यात जोरदार पसंती मिळाली आहे.
निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने नुकत्याच पार पडलेल्या, पुणे येथील व्हीएसआयच्या प्रदर्शनात अद्ययावत ऊस शेती संदर्भात स्टॉलमध्ये सहभाग नोंदवून ग्रामीण भागातील ऊस शेती व साखर कारखान्याकडून उत्पादित होणारे विविध प्रकारची खते, साखर उत्पादन याची माहिती सहज उपलब्ध व्हावी, म्हणून राज्याचे माजी सहकारमंत्री व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनात अद्यावत स्टॉल उभारण्यात आला होता. यामध्ये जवळपास 250 स्टॉल सहभागी झाले होते.
प्रदर्शनात स्टॉलच्या माध्यमातून माहिती शेतकऱ्यांना पोचवण्यासाठी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, ऊस पुरवठा अधिकारी धनंजय लिंबोरे, शेतकी अधिकारी कल्याण पताळे, पर्यावरण विभागाचे कल्याण गायकवाड यांच्यासह नीरा-भीमा कारखाना प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या स्टॉलद्वारे राज्यातील व राज्याबाहेरील शेतकऱ्यांना अद्ययावत ऊस शेतीची माहिती स्टॉलद्वारे उपलब्ध केल्याबद्दल पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंह रंधवा यांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी साखर संघाचे शिवाजीराव देशमुख, साखर संघाचे पदाधिकारी यांनी इंदापूर तालुक्यातील उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.