पिंपरी, दि. 8 – नाशिक येथील अशोका सेंटर फॉर बिझनेस ऍण्ड कॉम्प्यूटर स्टडीज महाविद्यालयाच्या वतीने युरेका या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण कल्पना स्पर्धा नुकतीच पार पडली. प्रस्तावित समाधानासह समस्या ओळख या श्रेणीमध्ये डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी एम. एस्सीच्या प्रणौती जगदाळे हिने प्रथम क्रमांक मिळविला. जगदाळेला 21 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले. प्रणौतीचे मार्गदर्शक म्हणून प्रा. प्रियंका शिवनीकर यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांच्या बुद्धीला वेगळा व कल्पक विचार करण्याची चालना मिळावी होता. अस्वच्छ सार्वजनिक शौचालय वापरल्यामुळे होणारे मूत्रमार्गाचे संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्यासाठी स्वयंचलित कार्यरत मॉडेल प्रणौतीने स्पर्धेत सहभागी केले होते. प्रणौतीच्या या यशाबद्दल प्रणौतीचे व तिच्या मार्गदर्शक प्रा. प्रियंका शिवनीकर यांचे डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी सत्कार करून कौतुक केले.