पिंपरी, दि. 23 – तत्कालीन शिवसेनेचे माजी नगरसेवक, स्मार्ट सिटीचे माजी संचालक प्रमोद कुटे तसेच महिला संघटिका उर्मिला काळभोर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीत मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. या वेळी पक्षप्रवेशाचा करण्यात आला.
या वेळी शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आकुर्डी भागातून प्रमोद कुटे विजयी झाले होते. स्मार्ट सिटीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ठाकरे गटात असलेल्या प्रमोद कुटे यांच्यासह महिला संघटिका उर्मिला काळभोर, विभागप्रमुख फारुक शेख, मंगेश कुटे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून शिवसेनेत प्रवेश केला.
शहरातील शास्तीकराचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे अनधिकृत घरांचा प्रश्न सुटणार आहे. प्राधिकरण बाधितांना साडेबारा टक्के परतावा देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्या असल्याचे प्रमोद कुटे यांनी सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वार शिवसैनिकांचा विश्वास असल्यानेच ठाकरे गटातील लोक शिवसेनेत येत आहे. शहरात शिवसेनेची ताकद वाढत आहे.