नगर -अहमदनगर जिल्हा मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने “आंतरजाल उपक्रमाच्या’ माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मराठी विषयाचे गद्य, पद्य, व्याकरण, स्थूलवाचन व उपयोजित लेखनातून मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे या संघाने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी अरुण धामणे यांनी केले.
माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रंगनाथ सुंबे व उस्मानाबाद जिल्हा मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष भागवत घेवारे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरु करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, संजय कळमकर व मुख्याध्यापक भाऊसाहेब रोहकले, बाळासाहेब डोंगरे, रंगनाथ सुंबे, धनराज शेवाळे उपस्थित होते.
जिल्हा मराठी माध्यमिक शिक्षक संघाने करोनाच्या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. संजय कळमकर यांनी काही शब्द व म्हणी यांची व्युत्पत्ती कशी झाली याचे विनोदी शैलीत वर्णन केले. मराठी शिक्षकांनी मराठी भाषेला समृद्धीकडे नेल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक भाऊसाहेब रोहकले यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक कार्याला ताकद देणारा उपक्रम असल्याचे मान्य केले.