66 वर्षांपूर्वी प्रभात : पाकिस्तानी घटना परिषदेत राज्यघटनेला कसून विरोध

कराची, ता. 23 – पश्‍चिम पंजाब, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत, भवालपूर या भागांतून पाकिस्तानी घटना परिषदेत निवडून आलेल्या सभासदांची एक गुप्त बैठक भरून पश्‍चिम पंजाबमधून निवडून आलेल्या सभासदांनी आपल्या घटना परिषदेच्या सभासदत्वाचे राजीनामे द्यावेत, असा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. त्याचप्रमाणे पाकिस्तानी राज्यघटनेसंबंधीचे बिल मंजूर करू नये, असेही या गुप्त बैठकीत ठरविण्यात आले.

पाकिस्तान घटना परिषदेत राज्यघटनेसंबंधीचे बिल ता. 28 ऑक्‍टोबर रोजी मांडण्यात येणार असल्याचे कळते. पश्‍चिम पंजाबचे मुख्यमंत्री फिरोझखान नून यांच्या घरी ही बैठक भरली होती. सध्या सिंधचे राज्यपाल म्हणून काम करणारे मामदोतचे नवाब, पश्‍चिम पंजाबचे माजी मुख्यमंत्री मियॉं मुमताझ दौलताना, गृहमंत्री मुश्‍ताक अहमद गुरमणी, सरदार अब्दुर रशीद ही मंडळी या गुप्त बैठकीला हजर होती, असे म्हणतात. पश्‍चिम पाकिस्तानचे एक सब फेडरेशन करावे, या प्रश्‍नावर लोकमताचा कौल घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
पंडित नेहरूंच्या वाढदिवशी

कबुतरे उडविणार!

नवी दिल्ली – पं. नेहरूंच्या 66व्या वाढदिवसानिमित्त 14 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील नॅशनल स्टेडियमच्या मैदानावर शांतता व वैभव यांचे प्रतीक मानण्यात येत असलेली 66 पांढरी शुभ्र कबुतरे उडविली जाणार आहेत. पहिले कबूतर स्वतः नेहरूच उडवतील. त्यानंतर 12 वर्षांच्या आतील शाळकरी विद्यार्थी कबुतरे उडवितील. नॅशनल स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमास सुमारे 6 हजार विद्यार्थी, दिल्लीतील प्रतिष्ठित नागरिक व राजनैतिक प्रतिनिधी हजर राहतील.

युगोस्लाव्हियाचा पंचशिलेला पाठिंबा

नवी दिल्ली – पंतप्रधान नेहरू यांच्या चीनच्या दौऱ्यामुळे जगातील तंग वातावरण हळूहळू सौम्य होईल. जागतिक शांततेच्या दृष्टीने या भेटीला फार महत्त्व आहे असे उद्‌गार भारतातील नियोजित युगोस्लाव्हियन वकील बॉगदान क्रेनद्राया यांनी काढले. ते म्हणाले, “”नेहरू-चाऊ एन लाय यांची पंचशिला युगोस्लाव्हियाला मान्य आहे. युगोस्लाव्हिया त्याच पंचतत्त्वांसाठी झगडत आहे.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.