अग्रलेख : कुस्तीगिरांना दिलासा

भारतीय कुस्ती क्षेत्राला लागलेल्या वादाच्या ग्रहणाची दखल अखेर मोदी सरकारने घेतली आणि भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तमाम भारतीय कुस्तीवीरांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये राजकारणाचे वर्णन करत असताना नेहमीच ‘राजकारणाचा आखाडा’ असे शब्द वापरले जातात. कारण राजकारणामध्ये सक्रिय असलेले राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते नेहमीच एकमेकांविरुद्ध लढताना कुस्तीगिराच्या भूमिकेतूनच संघर्ष करत असतात. हे जरी एका बाजूला खरे असले तरी सध्या भारताच्या कुस्ती या खेळात जे राजकारण सुरू होते ते मात्र वेगळ्या प्रकारचे मानावे लागेल. गेले वर्षभर भारतीय कुस्तीला या वादाने ग्रासले होते आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना वाढत चालली होती.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीमध्ये वादग्रस्त माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांचे जवळचे आणि निष्ठावंत सहकारी संजयसिंग यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे देशातील प्रमुख कुस्तीगीर नाराज झाले होते. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होते म्हणून त्यांना या पदापासून बाजूला करण्यात आले होते व त्यांच्या वरील या आरोपाची सध्या चौकशीही सुरू आहे. असे असताना त्यांच्याच एका जवळच्या सहकार्याच्या हातात कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद गेल्यामुळे भारतातील कुस्तीला कोणतेही भवितव्य राहिलेले नाही, असे देशातील प्रमुख कुस्तीगिरांना वाटत असेल, तर त्यात चुकीचे काही नाही. संजयसिंग यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी किंवा या नियुक्तीचा निषेध करण्यासाठी साक्षी मलिक या ऑलिम्पिकवीर महिला कुस्तीगिराने आपण कुस्तीला रामराम ठोकत असल्याची घोषणा केली, तर बजरंग पुनिया या ‘पद्मश्री’वीराने आपले पद्मश्री पदक परत केले.
ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात वर्षभरापासून आंदोलन करणार्या सगळ्याच कुस्तीगिरांच्या मनात अशीच भावना होती. याबाबत सरकारने वेळीच गांभीर्याने काही केले नसते, तर ज्या कुस्ती क्षेत्रामध्ये भारताची प्रगती होत आहे असे वाटत आहे ते कुस्ती क्षेत्र पुन्हा अधोगतीकडे जाण्याची भीती होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या आदेशाप्रमाणे आणि जागतिक कुस्ती महासंघाच्या सूचनेप्रमाणे आम्ही योग्य प्रकारे लोकशाही मार्गाने निवडणूक घेतली असून त्याच आधारे संजयसिंग यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, अशी भूमिका जरी कुस्ती महासंघाने घेतली असली तरी संजयसिंग आणि ब्रिजभूषण सिंग यांच्यातील जवळीक कुस्तीगिरांसाठी निश्चितच त्रासदायक ठरणार होती. जरी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलीस चौकशी सुरू असल्याने ब्रिजभूषण जरी कुस्ती क्षेत्रापासून दूर असले तरी त्यांच्या निष्ठावंत सहकारी संजयसिंग यांच्या हातातच हे क्षेत्र गेल्यामुळे आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी ब्रिजभूषण करू शकतात अशीच भीती व्यक्त होत होती. नॅशनल वूमेन्स ज्यूनिअर रेसलिंग चॅम्पियनशिप ज्या ठिकाणी भरवण्यात आली होती ते गोंडा हे शहर ब्रिजभूषण यांचेच आहे.
म्हणजे आपले या क्षेत्रावर अजूनही वर्चस्व आहे हेच नॅशनल चॅम्पियनशिप आपल्या शहरात भरवून ब्रिजभूषण यांनी सिद्ध करून दाखवले होते. पण आता सरकारने कुस्ती महासंघ बरखास्त करून सर्व स्पर्धाही रद्द केल्या आहेत. या वूमेन्स नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतलेल्या अनेक महिला कुस्तीगिरांनी साक्षीकडे तक्रारीही केल्या होत्या. पण त्याची कोणतीही दखल घेण्याच्या मनस्थितीमध्ये नवे अध्यक्ष संजयसिंग नव्हते. साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतल्यावर तसेच बजरंग पुनियाने पद्मश्री परत केल्यानंतर संजयसिंग यांनी ज्या प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते पाहता त्यांना या घटनांबाबत काहीच गांभीर्य नव्हते, असेच दिसून येते. ‘क्रीडापटूंना विशेषतः कुस्तीगिरांना जर राजकारण करायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे ज्यांना कुस्ती खेळायची त्यांनी कुस्ती खेळावी, ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी राजकारण करावे’, अशा प्रकारची कुत्सित प्रतिक्रिया संजयसिंग यांनी व्यक्त केली होती. खरेतर राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व महिला कुस्तीगिरांना दिलासा देणारी एखादी कृती करणे अपेक्षित होते.
किमान या कुस्तीगिरांना समजावून सांगून त्यांचे मन वळवणे अपेक्षित होते. पण संजय सिंग यांच्या या प्रतिक्रिया पाहता ते आपले गुरू ब्रिजभूषण सिंग यांच्या पावलावर पाऊल टाकूनच कुस्ती महासंघाचा कारभार हाकणार, असेच संकेत मिळत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे अनेक जवळचे सहकारी यांनी या विषयाबाबत दीर्घकाळ कोणतीही भूमिका घेतली नव्हती. अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये दुर्लक्षाचे राजकारण करून त्या विषयाला महत्त्व न देण्याची रणनीती जरी अनेक वेळा नरेंद्र मोदी राबवत असले तरी कुस्ती क्षेत्राबाबत त्यांना हे दुर्लक्ष करण्याचे राजकारण परवडणार नव्हते. म्हणूनच अखेर सरकारला कारवाई करावी लागली.
काही महत्त्वाच्या क्रीडापटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा पराक्रम केला की हे खेळाडू भारतात परतल्यावर त्यांच्यासोबत फोटोसेशन करण्याची प्रक्रिया इमानेइतबारे पार पाडणार्या नरेंद्र मोदी यांनी कुस्ती या क्षेत्राला लागलेल्या या वादाच्या ग्रहणाकडेही गांभीर्याने पाहिले हे बरे झाले. लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन संजय सिंग यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली हे जरी मान्य करण्यासारखे असले तरी त्यांनी चुकीच्या प्रकारे ब्रिजभूषण सिंह यांच्याप्रमाणेच कारभार केला असता तर भारतीय कुस्ती क्षेत्राचा निश्चितच तोटा झाला असता.
संजय सिंग यांच्या निवडीनंतर ज्या प्रकारे कुस्ती क्षेत्रामध्ये नाराजी होती आणि विविध आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर या क्षेत्रापासून बाजूला जाण्याची भूमिका घेत होते ते पाहता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनासुद्धा या विषयाची गंभीर दखल घेऊन हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवावाच लागणार होता. ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप होते आणि त्याविषयी चौकशी सुरू आहे, हे वास्तव आणि तथ्य नाकारता येत नाही. अशा नेत्याची पाठराखण करणेसुद्धा नरेंद्र मोदी सरकारला अडचणीचे वाटले असावे. ब्रिजभूषण सिंग जरी अप्रत्यक्षपणे कुस्ती क्षेत्रापासून दूर असले तरी संजय सिंग यांच्या माध्यमातून ते या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करत राहिले असते, हे उघड आहे आणि तसे झाले तर कुस्ती क्षेत्राचे अधिक नुकसान झाले असते.
वर्षभर सुरू असलेल्या विषयाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कधीच गांभीर्याने लक्ष दिले नव्हते. पण आता लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना त्यांना या कुस्ती क्षेत्रात शिरलेल्या राजकारणाकडे दुर्लक्ष करणे महागात पडले असते. पद्मश्री प्राप्त कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक गाजवणार्या महिला कुस्तीगिरांच्या भावना लक्षात घेऊन एखादा निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्याची हीच वेळ होती आणि सरकारने ही वेळ साधून योग्य निर्णय घेऊन कुस्तीचा आखाडा ‘राजकारणाचा आखाडा’ होणार नाही याची दक्षता घेतली, ते बरे झाले. आता साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि इतर कुस्तीगीर निर्धास्तपणे खेळावर लक्ष केंद्रित करू शकतील.





