मुंबई – अमेरिका, युरोप सह जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक मंगळवारी वधारले. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही सकाळपासून मोठ्या प्रमाणात खरेदी होऊन निर्देशांक अडीच टक्क्यांनी वाढले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,344 अंकांनी वाढून 54,318 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 417 अंकांनी म्हणजे 2.63 टक्क्यांनी वाढून 16,259 अंकांवर बंद झाला. गेल्या तीन महिन्यात निर्देशांक एका दिवसात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
ऊर्जा आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची आज गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली असल्याचे दिसून येते. टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, विप्रो, आयसीआयसीआय बॅंक, मारुती या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ झाली. विशेष म्हणजे सकाळीच घाऊक किमतीवरील महागाई वाढून 15 टक्क्यांच्या वर गेली असल्याची आकडेवारी जाहीर होऊनही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे बऱ्याच विश्लेषकांना आश्चर्य वाटले.
चीनमध्ये करोना रुग्णाची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे तेथील निर्बंध उठविले जाण्याची शक्यता असल्यामुळे चीनसह, दक्षिण कोरिया, जपान इत्यादी देशातील शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. असे असले तरी आज एलआयसीच्या शेअरची शेअर बाजारावर नोंदणी झाली. मात्र या शेअरला गुंतवणूकदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. दरम्यानच्या काळामध्ये क्रुडचे दर वाढले आहेत.
शेअर बाजारानी जारी केलेल्या आकडेवारीनुसार काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1788 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. आज क्षेत्रीय निर्देशांकात देखील वाढ झाली. निफ्टी बॅंक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, निफ्टी आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बॅंक, प्रायव्हेट बॅंक, रियल्टी, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये चांगली खरेदी झाली. त्यामुळे आज सर्व क्षेत्रातील निर्देशांकात 1 ते 3 टक्क्यांची वाढ झाली. चीनमधील लॉकडाऊन उठण्याच्या शक्यतेमुळे आज मेटलमध्ये तेजी दिसून आली. चीन मेटलचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे.