शिक्रापूर- येथील कचरा प्रकल्प अनेक दिवसांपासून परवानगी मिळून देखील प्रलंबित आहे. गावातील कचरा समस्या काही केल्या सुटत नसताना आता राजकीय कुरघोड्यांमुळे शिक्रापूरमधील कचरा थेट बाजार मैदानात पसरला आहे. अनेक दिवसांपासून येथील कचरा प्रश्न सुटेल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. परंतु या प्रश्नावर राजकीय ठिणगी पडल्यामुळे सध्या येथील कचरा प्रश्न पेटला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शिक्रापूर येथील मुख्य समस्या कचरा असून कचरा साठवण्यासाठी तसेच संकलित करण्यासाठी कोठेही जागा उपलब्ध होत नसल्याने काही वर्षांपूर्वी कचरा वेळ नदीच्या कडेला आणून टाकला जात होता. कालांतराने त्याठिकाणी मोठे ढीग होऊ लागल्याने त्याच जागेवर कचरा जाळला जाऊ लागला. त्यामुळे नागरिकांना धुराचा मोठा त्रास होत असताना ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणच्या कचरा प्रकल्पांना भेटी देत गावामध्ये कचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेत याबाबत ठराव करुन या कामाचे पूजन देखील केले.
दरम्यान गावामध्ये संकलित झालेला सर्व कचरा पुणे येथील कचरा प्रकल्पाला देण्याचे ठरले. त्याप्रमाणे सर्व कचरा पुणे येथे जाऊ लागला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तात्पुरता कचरा प्रकल्प शेड उभारुन तेथे कचरा विघटन करुन पुढे पाठवण्यासाठी शेडची उभारणी करुन कामाला सुरूवात झाली परंतु यावेळी उपसरपंच रमेश थोरात व त्यांच्या गटाने हे काम बंद पाडले. परिणामी तात्पुरता कचरा प्रकल्प शेड उभे राहू शकले नाही, मात्र नियमितपणे टाकला जाणाऱ्या जागेवर कचरा टाकला जात असल्याने येथे मोठे ढीग साचले गेले, परंतु सध्या पुणे येथे जाणारा कचरा हा सरपंच रमेश गडदे यांनी बंद केला.
पुण्यातील येणाऱ्या गाड्या बंद केल्या आहेत. त्यामुळे येथे टाकला जाणारा सर्व कचरा सध्या बाजार मैदानात पोहोचला असल्याने बाजार मैदानाला कचरा कुंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे सरपंच यांनी ठराव करुन सुरू असलेले पुणे येथे कचरा देण्याचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी उपसरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे, ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, सारिका सासवडे, वंदना भुजबळ, सीमा लांडे यांनी केली आहे. मात्र ग्रामपंचायतीमधील दोन गटांच्या राजकारणात गावातील कचरा प्रश्न संपणार की असाच राजकीय कुरघोड्यात धुमसणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
“शिक्रापूर येथे कचरा प्रकल्प होईपर्यंत पुणे येथील कचरा प्रकल्पाला कचरा देण्याचे काम ग्रामपंचायत ठरावानुसार ठरलेले आहे. त्याबाबत करार झालेला आहे, मात्र ते सध्या सरपंच यांनी बंद केले आहे. परंतु नागरिकांच्या सोयीसाठी ठरावाप्रमाणे ते काम तातडीने सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.”
– रमेश थोरात, उपसरपंच शिक्रापूर
“शिक्रापूर येथे तात्पुरत्या कचरा प्रकल्प शेडचे काम सुरू होते तसेच गोळा झालेला कचरा देखील ठेकेदार घेऊन जाणार होता, परंतु विरोधी गटाने कचरा प्रकल्प शेडचे काम बंद पाडले आहे. तसेच पुणे येथे जाणाऱ्या कचऱ्याला दिला जाणारा खर्च जास्त असल्यामुळे सध्या पुणे येथे कचरा देण्याचे काम बंद केले आहे.”
– रमेश गडदे, सरपंच शिक्रापूर