संशयिताने बदलला होता मुक्काम
संशयित शेख हा मीना यांचा खून करण्यापुर्वी साताऱ्यात राहण्यास होता. मात्र, त्यांचा खून केल्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये, म्हणून त्याने सुतारवाडी (पुणे) येथे मुक्काम ठोकला होता. मात्र, सातारा तालुका पोलिसांनी त्याला एक वर्षाने बेड्या घालूनच साताऱ्यात पुन्हा आणला.
सातारा – आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादामुळे हामदाबाज (ता. सातारा) येथील महिलेचे हातपाय प्लॅस्टिकच्या चिकटपट्टीने बांधून व तोंडास प्लॅस्टिकची पिशवी बांधून खून केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. सत्तार नन्नु शेख (रा. लातुर, सध्या रा. सुतारवाडी, पुणे) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले.
तब्बल एक वर्षाने या खुनाला वाचा फोडण्यात तालुका पोलिसांना यश आले असून सोबत संशयितांच्याकडून ट्रॅक्टर चोरीचाही उलगडा पोलिसांनी केला आहे.
याबाबत माहिती अधिक माहिती अशी की, सातारा शहरालगत असणाऱ्या हामदाबाज येथील माती परीक्षण केंद्रात मीना आनंदराव देसाई (वय 50) राहत होत्या. त्या एका दवाखान्यात आयाचे काम करीत होत्या. त्यांच्या घराचे बांधकाम संशयिताने केल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांच्यात आर्थिक व्यवहार होत होते.
त्यातूनच झालेल्या वादामुळे संशयिताने रविवार दि. 29 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मीना यांचे दोन्ही हात व पाय प्लॅस्टिकच्या चिकटपट्टीने बांधले. त्यानंतर तोंडास प्लॅस्टिकची पिशवी बांधून गळ्याभोवती चिकटपट्टी बांधून त्यांचा खून केला होता. या घटनेबाबत मृत मीना यांची मुलगी पूनम शशिकांत शेलार (वय 29, रा. तामजाईनगर, करंजे) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळावरून व इतर पुराव्यांच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, संशयितांनी कोणताही ठोस पुरावा घटनास्थळावर ठेवला नसल्याने त्यांना पडताळण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. अखेर तालुका पोलिसांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तब्बल एक वर्षाने सुतारवाडी (पुणे) येथून संशयिताला बेड्या ठोकल्या.
त्यानंतर त्याने मीना यांचा खून केल्याची कबुली दिली असून, या खुनात त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगाही असून दोघांनी मीना यांच्या खुनासोबत सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक ट्रॅक्टर चोरल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दादा परिहार, राजू मुलाणी, राजेश वंजारी, सुजीत भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार, सागर निकम, नितीनकुमार थोरात, निलेश जाधव, महेंद्र पाटोळे यांनी केली.