पुणे:अॅट्रोसिटीची भीती दाखवून डॉक्टरकडून 75 लाख रूपयांची खंडणी उकळणाऱ्याला धमकावून पाच लाख रुपये घेतलेल्या पोलीस मित्र जयेश भगवानदास कासट (वय 42, रा. एरंडवणा) याचा जामीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस.जोंधळे यांनी फेटाळला.
याप्रकरणी डॉ. हेमंत तुकाराम अडसुळ (वय-55, रा. सहकारनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2 ते 6 जानेवारी 2020 या कालावधीत नारायण पेठ आणि सॅलिसबरी पार्क येथे घडली.
फिर्यादी यांचा भाऊ मनोज अडसुळ याने डॉ. दिपक रासने यांच्याकडून 75 लाख रूपये घेतले होते. त्यातील पाच लाख रुपये जयेश याने धमकावून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना कासट याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी विरोध केला.
तर, फिर्यादीच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. हितेश सोनार आणि अॅड. दिग्विजय ठोंबरे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. खंडणीसाठी कोणाची मदत घेतली याचा शोध घेण्यात येत आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील पाच लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यावरून प्रथमदर्शनी त्याने गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. जामीन मिळाल्यास तो तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी अॅड. विजयसिंह जाधव यांनी केली.