पुणे: अॅट्रोसिटीचा गुन्हा लावण्याची भीती दाखवत डॉक्टरकडून 75 लाख रुपयांची खंडणी उकळलेल्या प्रकरणात मनोज अडसूळ याचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळला. या प्रकरणात डॉ. दीपक प्रभाकर रासने (वय 69, रा. पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा डॉ. साहिल यांच्याविरुद्ध एका महिलेने ऑक्टोबर 2019 रोजी विनयभंगाची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल आहे.
या प्रकरणात अडसूळ याने तुमच्या मुलावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी भीती फिर्यादी यांना दाखवली. त्या आधारे फिर्यादींकडून 75 लाख रुपये खंडणी घेतली. तर 55 लाखाची मागणी करीत होता, असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार अडसूळ याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून, त्यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. दिग्विजय ठोंबरे आणि अॅड. रणजित धुमाळ यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. गुन्हा घडून अनेक महिन्यांचा कालावधी उलटला असून, फिर्यादी इतक्या दिवस का गप्प होते. अडसूळ आणि फिर्यादी यांच्यात व्यवहार झाला आहे. डॉ. रासने यांनी धनादेश पैसे दिले असून, खंडणी धनादेश स्वरूपात दिली जाते का, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देण्याची मागणी ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी केली. यास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. पाठक यांना फिर्यादीचे वकील सचिन ठोंबरे यांनी मदत केली.
अडसूळ याने गुन्हातील पैशाचे काय केले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी, त्याने एका बॅंकेच्या खात्यातील 54 लाख रुपये 121 जणांना ट्रान्सफर केले आहेत. याबाबत तपास करण्यासाठी त्याला अटक करणे गरजेचे आहे. त्याचा अटकपूर्व फेटाळण्याची मागणी ऍड. पाठक यांनी केली