उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
पिंपरी: देहूरोड येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. यामुळे पोलिसांवरील कामाच्या ताणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आत्महत्येची गंभीर दखल पोलीस आयुक्त संदीप बिष्णाई यांनी घेत याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
देहूरोड येथील महिला कर्मचारी वाघमारे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. मात्र वाघमारे यांचे पती यांनी प्लॉट खरेदी करण्यासाठी पत्नीच्या नावावर पोलीस सोसायटीमधून आठ लाखांचे कर्ज काढले होते. त्यानंतर दुचाकी घेण्यासाठीही पत्नीच्या नावे कर्ज काढले होते. तसेच एका नातेवाईकावरून त्यांच्यात भांडणे होत होती. ड्युटीमुळे वाघमारे वेळी अवेळी घरी येत असल्याने त्या दांपत्यामध्ये भांडणे होत होती. पतीच्या त्रासाला कंटाळून वाघमारे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात दिली. यामुळे पोलिसांच्या आत्महत्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
कामाचा ताण, कौटूंबिक कलह, गावी असलेली मालमत्ता, विविध आजार, कर्जबाजारीपणा आणि इतर कारणावरून पोलीस कर्मचारी आत्महत्या करीत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णाई यांनी पोलीस निरीक्षकांना विविध सूचना दिल्या आहेत. पोलिसांचे शाररीक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पोलिसांकरिता विविध उपक्रम राबविणे, यामध्ये पोलीस कर्मचारी यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे. त्यात आजार असलेल्या पोलिसाला औषधोपचाराबाबत सूचना देणे, पोलिसांना मंजूर करण्यात आलेल्या सुट्ट्या मिळतात की नाही, याची खातरजमा करणे आदींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यांना भेटीच्यावेळी पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.