२४९ संशयित वाहन चालकांची तपासणी
पिंपरी, दि. २ – नववर्षाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. चौकाचौकात पोलीस तैनात होते. पोलिसांनी शेकडो संशयित वाहने आणि वाहन चालकांची तपासणी केली. त्यात मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या ४१ जणांवर कारवाई करण्यात आली. रात्रीत १५७५ वाहनांची तर २४९ वाहन चालकांची तपासणी केली.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्याचे पेगवर पेग रिचवून नशेत झिंगून आनंद साजरा करण्यावर अनेकजण भर देतात. एवढ्यावर थांबतील ते तळीराम कसले. दारूच्या नशेत भरधाव वेगात वाहन चालवत हे तळीराम जाताना दिसतात. भरधाव वेगात वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सज्ज असतात. यावर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला अडीच हजार पोलीस शहरातील रस्त्यांवर उतरले होते. कटिंग चहाने नवीन वर्षाचे स्वागत करून पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले.
संशयित वाहन चालकांना अडवून त्यांची तपासणी करण्यात येत होती. ब्रेथ एनलायझरच्या वापरास परवानगी नसल्याने संशयित वाहन चालकांचे थेट रक्ताचे नमुने घेतले जात होते. पोलिसांची नाकाबंदी पाहून अनेकांनी आपला रस्ता बदलला. संशयित २४९ वाहन चालकांची तपासणी करून एका रात्रीत ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी पोलिसांनी ४१ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली.
रात्रीच्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ होती. पोलिसांनी संशयित १५७५ वाहनांची तपासणी केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, सीटबेल्टचा वापर न करणे आणि अन्य प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८० वाहनांवर कारवाई झाली. तर सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा वाहनांवर पाच खटले दाखल करण्यात आले. बेदरकारपणे भरधाव वाहन चालवणाऱ्या ३७ दंडात्मक कारवाई करण्यात आली.