पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा करोनामुळे ठप्प असल्याने आधीच तोट्यात असणाऱ्या पीएमपीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले असून या अनुषंगाने पालिकेकडून संचलन तूट देण्यात येणार आहे. सन 2020-21 या कालावधीत सुमारे 514.28 कोटी रुपयांची संचलन अपेक्षित तूट असून, या तुटीपोटी उचल स्वरुपात महामंडळाने पालिकेकडे 60 टक्के स्वामित्त्वानुसार सुमारे 111.48 कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर येत्या आर्थिक वर्षात पीएमपीसाठी 378.67 कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे.
पीएमपीकडे स्वमालकीच्या सुमारे 1 हजार 475 बसेस आणि भाडेतत्त्वावरील 806 सीएनजी बसेस आणि 150 ई-बसेस अशा एकूण 956 बसेस ताफ्यात आहेत. लॉकडाऊनमध्ये एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी दररोज सरासरी 205 बसेस धावल्या असून, याद्वारे दररोज सरासरी 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
या दरम्यान प्रतिदिनी 1.48 कोटी रुपयांप्रमाणे 226.44 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तर सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दररोज सरासरी 687 बसेस मार्गावर धावल्या असून, त्याद्वारे रोज सरासरी 31 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, या कालावधीत प्रतिदिनी 1.21 कोटी रुपयांप्रमाणे 110.11 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
कमी उत्पन्नामुळे दोन्ही पालिकांकडून सन 2019-20 ची मिळणारी संचलन तूट अपुरी आहे. त्यामुळे सन 2020-21 या आर्थिक वर्षातील संचलन तुटीपोटी उचल स्वरुपात महामंडळाने पालिकेच्या 60 टक्के स्वामित्वानुसार 111.48 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
सन 2021-22 मध्ये 12 मीटर लांबीच्या बीआरटी एसी इलेक्ट्रीक 350 बसेस जीसीसी तत्वावर आणि फेम 150 बसेस घेण्याचे नियोजित असल्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे.
514.28 कोटी अंदाजित संचलन तूट रक्कम
743.89 कोटी 2020-21 अंदाजित खर्च
229-61 कोटी अंदाजित एकूण उत्पन्न