मान्सूनपूर्व पावसाची सुखद हजेरी

मान्सूनची वाटचाल वेगाने
– दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात दाखल होणार
– राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

पुणे – तब्बल आठ दिवसांच्या विलंबाने केरळात दाखल झालेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या चोवीस तासांत तो दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात, तर केरळाच्या उर्वरित भागात दाखल होण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, रविवारी राज्यात सर्वत्र सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.

शनिवारी मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर आता तो महाराष्ट्रात कधी येणार याची उत्सुकता वाढली आहे. सध्या मान्सूनने केरळमधील कोची आणि तामिळनाडूतील मदुराईपर्यत मजल मारली आहे. लक्षद्वीप बेटे आणि लगतच्या अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पोषक ठरल्याने सोमवारपर्यंत (दि.10 ) कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्‍यता आहे. उत्तरकडे सरकत जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रामुळे मान्सूनच्या वाटचालीवर प्रभाव पडणार आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सुद्धा मान्सूनची दमदार प्रगती सुरू असून सोमवारपर्यंत मान्सून या राज्यांमध्ये धडकेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यात मान्सूनच्या आगमनाची चाहुल देणाऱ्या मान्सूनपूर्व सरी कोसळण्यास सुरूवात झाली आहे. कोकणात गेले दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्याचबरोबर घाट माथ्यावर ही मान्सूनचे ढग जमू लागले आहेत. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भात ही अनेक िंठकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातसुद्धा अनेक भागात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या 48 तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातसुद्धा अनेक ठिकाणी वादळी पाऊस बरसण्याची शक्‍यता आहे. त्याचबराबेर पावसामुळे तापमानात ही मोठ्या प्रमाणावर घट होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.