केरळला मोदींकडून नेहमीच सापत्न भावाची वागणूक – राहुल

मोदींच्या वक्तव्यावर घेतला आक्षेप

वायनाड – केरळातून आम्हाला एकही जागा मिळाली नाही तरी केरळ मला वाराणसी इतकेच प्रिय आहे असे जे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे त्यावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की पंतप्रधानांचा हा कळवळा खोटा आहे. त्यांनी आजवर बिगर भाजप शासित राज्यांना केवळ सापत्न भावाचीच वागणूक दिली असून केरळवरही केंद्र सरकारने नेहमीच अन्याय केला आहे.

ते म्हणाले की आताही त्यांच्याकडून केरळसाठी काही खास वागणुकीची अपेक्षा करता येत नाही. ते केवळ केरळबाबत खोटा कळवळा दाखवत आहेत. वेळ प्रसंगी आम्ही डावे पक्ष आणि कॉंग्रेस पक्ष राज्याच्या विकासासाठी एकत्र येऊ शकू पण भाजपकडून आम्हाला ही अपेक्षा करता येणार नाही. केरळात डाव्या पक्षांचे सरकार आहे म्हणून ते केरळला सापत्न भावाची वागणूक देत आहेत असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या केरळ दौऱ्याची आज सांगता झाली. ते तीन दिवस या राज्यातील वायनाड लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. वायनाड मधून राहुल गांधी हे तब्बल 4 लाख 31 हजार मतांनी विजयी झाले आहेत. मतदारांचे आभार मानण्यासाठी ते येथे आले होते. काल पंतप्रधान मोदींनीही केरळचा एक दिवसाचा दौरा करून गुरूवायुर मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी केरळ बाबत हे वक्तव्य केले होते.

राहुल यांच्या जन्माच्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नर्सची राहुल यांनी घेतली हद्य भेट
राहुल गांधी यांचा 49 वर्षांपुर्वी जेव्हा जन्म झाला, त्यावेळी रूग्णालयात हजर असलेल्या एका माजी परिचारीकेची आज राहुल गांधी यांनी भेट घेतली. राजम्मा असे या नर्सचे नाव असून ती मुळची केरळचीच रहिवासी आहे. आणि ती वायनाड मतदार संघातील मतदार आहे. याच महिन्यात राहुल गांधी यांचा 19 जुनला वाढदिवस आहे. राजम्मा राजप्पन यांची प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांनी जेव्हा राहुल यांच्याशी भेट घालून दिली त्यावेळी राजम्मा यांनी राहुल यांना प्रेमातिशयाने मिठी मारली. राहुल यांनीही त्यांची आस्थेने विचारपूस केली. हा प्रसंग उपस्थितांसाठी भावस्पर्शी ठरला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.