पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयातून करोनामुक्त झालेल्या तीन महिला रुग्णांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. त्यामध्ये दोन ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे. येरवडा, लक्ष्मीनगर आणि आंबेगाव बुद्रुक येथील त्या रहिवाशी आहेत.
संबंधितांना चौदा दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर घेतलेल्या सलग दोन करोना चाचण्यांमध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले. करोनामुक्त झालेल्या महिलांचे वय 32, 60 आणि 77 असे आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
त्यातील दोन ज्येष्ठ महिलांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार देखील आहेत. तरीही त्या करोनावर मात करीत ठणठणीत बऱ्या झाल्या. दरम्यान, पुण्यातील नायडू रुग्णालयातून गुरुवारी 70 वर्षीय करोना बाधित रुग्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. लक्ष्मीनगर-येरवडा येथील हा रुग्ण आहे, अशी माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश रोकडे यांनी दिली. रुग्णालयामध्ये आज (गुरुवारी) नव्याने 11 संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत एकूण 499 करोना संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाची चाचणी घेण्यात आली. त्यातील 44 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर, 22 जण करोनामुक्त झाले. 7 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.