पिंपरीमध्ये भाजप-सेना कार्यकर्त्यांत तणाव
पोलिसांचा सौम्य लाठीमार
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर चप्पल भिरकवल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी फडणवीस शहरात आले होते. पूर्णानगर येथे उद्यानाच्या उ्घाटनासाठी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा आला असता हा प्रकार घडला.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यानंतर देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर प्रवेशद्वारासमोर असलेल्या गर्दीमधून अज्ञात व्यक्तीने फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावली. चप्पल फेकणारी व्यक्ती कोण होती हे समोर आलेले नाही.
पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस दाखल झाले होते. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने शहरामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाचे उद्घाटन होणार होते.
त्याचवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादीने उद्यानाच्या समोरच झेंडे, काळ्या फिती दाखवून भाजपाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर मोदी, मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी समोरासमोर आल्यामुळे तणाव वाढला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेतली.