- धोका कायम ः शहरातील 9 लाख नागरिकांना करोना होऊन गेल्याची शक्यता
- सिरो सर्व्हेचे परिणाम काहीसे चिंताजनक
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका आणि डॉ. डी वाय पाटील रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाचा सिरो स्वर्हे करण्यात आला. सर्वेक्षण केलेल्या एकूण नागरिकांपैकी केवळ 34 टक्के नागरिकांमध्ये करोनाविरोधातील अँटीबॉडीज आढळल्या आहेत. शहराची एकूण लोकसंख्या 25 लाख पकडली. तर या आकडेवारीच्या आधारे आतापर्यंत शहरातील सुमारे 9 लाख नागरिकांना करोना होऊन गेला आहे. शहराची एकूण लोकसंख्या पाहता “पॉझिटिव्हीटी’ कमी आढळली आहे. त्यामुळे शहरामध्ये अद्याप करोनाचा धोका कायम असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
शहरामध्ये महापालिका आणि डॉ. डी वाय पाटील यांच्या विद्यमाने 7 ते 17 ऑक्टोबर या कालवधीत दहा दिवसांचा सिरो सर्व्हे करण्यात आला. त्या सर्व्हेमधून शहरातील करोनाबाबत निघालेल्या निष्कर्षाबाबत महापालिका भवनमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारुढ पक्षेनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, कोविड तांत्रिक समितीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ. अमित बॅनर्जी, डॉ. भार्गव गायकवाड, डॉ. अतुल देसले उपस्थित होते.
सोसायट्यांमध्ये सर्वांत कमी अँटीबॉडीज
सिरो सर्व्हे करण्यासाठी 200 क्लस्टरमध्ये शहराची विभागणी केली. 5 हजार नागरिकांचे सॅम्पल घेण्यात आले. त्यामध्ये झोपटपट्टी, गावठाण भाग आणि हाऊसिंग सोसायटी यामध्ये सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये सर्वसाधारण नागरिकांमध्ये 33.9 टक्के पॉझिटिव्हीटी आढळून आली. म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे साडे आठ ते नऊ लाख नागरिकांमध्ये करोनाविरोधातील अँटीबॉडीज आहेत. झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये 37.8 टक्के, झोपडपट्टी सदृश भागातील नागरिकांमध्ये 38.3 टक्के, तर गृहनिर्माण सोसायटी भागातील नागरिकांमध्ये 27.7 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.
शहरातील पिंपळे निळख या भागामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हीटी आढळली आहे. या भागामध्ये सुमारे 75 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आहेत. तर सर्वात कमी संभाजीनगर या भागामध्ये अवघ्या 4 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.
महिलांमध्ये अँटीबॉडीजचा दर जास्त
शहरातील सिरो सर्व्हेमधून पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अँटीबॉडीजचा दर जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांमध्ये 33.8 टक्के अँटीबॉडीजज आढळल्या आहेत. तर पुरुषांमध्ये हा दर 28. 9 टक्के इतका आहे. तर वयानुसार 51 ते 65 वर्षाच्या नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात म्हणजेच 35.5 टक्के इतक पॉझिटिव्हीटीचा दर आढळून आला आहे. किशोरवयीन मुलांमध्ये (12 ते 18 वय) 34.9 टक्के, 19 ते 30 वर्ष वयोगटामध्ये 29.7 टक्के व 31 ते 50 वर्ष वयोगटामद्ये 31.2 टक्के दर आढळला आहे. तसेच 66 वर्ष वयोगटातील 28.2 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.
- नागरिकांमध्ये सर्वसाधारण-33.9 टक्के
- झोपडपट्टी भागातील नागरिकांमद्ये -37.8 टक्के
- झोपडपट्टी सदृष भाग-38.3 टक्के
- हाऊसिंग सोसायटी -27.7 टक्के
- महिलांमध्ये अँटीबॉडीजचा दर-33.8 टक्के
- पुरुषांमध्ये अँटीबॉडीजचा दर-28.9 टक्के