पुणे – कोथिंबिरीची आवक घटली. त्या तुलनेत मागणी जास्त आहे. त्यामुळे भाव कडाडले आहेत. घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत जुडीमागे तब्बल 10 रुपयांनी वाढ झाली. जुडीस 20 ते 35 रुपये मोजावे लागत असून, किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये भावाने जुडीची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी गणेश यादव यांनी दिली.
करडई आणि राजगिराच्या भावात जुडीमागे 2 रुपयांनी वाढ झाली. तर, पालक, मेथी, शेपू, चाकवत, मुळा, चुकाच्या भावात मागणी अभावी घसरण झाली. पालकच्या भावात जुडीमागे 7 रुपये, तर मेथीच्या भावात 4 रुपये, मुळा 3 रुपये, शेपू, चाकवत आणि चुकाच्या भावात प्रत्येकी 2 रुपयांनी घसरण झाली. उर्वरित पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती यादव यांनी दिली. मागील रविवारी कोथिंबिरीची सव्वालाख जुडी आवक झाली. त्यामध्ये घसरण होऊन रविवारी 80 हजार जुडींची आवक झाली. त्यापैकी 40 हजार जुडींची आवक लातुर भागातून झाली. मेथीची आवक मात्र दुप्पटीने वाढली आहे. गेल्या आठवड्यात 40 हजार जुडी झाली होती. ती रविवारी तब्बल 80 हजार जुडी झाल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.