पिंपरी – कटिबद्धा जनहिताय हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 41 वा वर्धापन दिन 11 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता पुष्पहार अर्पण करून तसेच अभिवादन करून विविध कार्यक्रमांस सुरूवात करण्यात येणार आहे. रक्तदान शिबीर, संगीत खुर्ची, रस्सी खेच, महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांसाठी माझी माती माझा देश, मेरा भारत महान तसेच ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा, गोड व तिखट पदार्थांची पाककला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस अर्थात वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
2022-23 या वर्षातील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच रांगोळी, पाककला व वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार समारंभही दुपारी 2 वाजता पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, येथे अधिकारी कर्मचारी सहभागी होऊन ऑर्केस्ट्रा सादर करणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.