पिंपरी – वारंवार नोटीस देऊनही मिळकत कर भरण्यास चालढकल करणाऱ्या 3 हजार 309 मालमत्तांवर महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने जप्तीची कारवाई केली. याद्वारे तब्बल 46 कोटी 99 लाख रुपये थकीत कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत एक लाख 186 मिळकतधारकांकडे 305 कोटी 69 लाख 75 हजार रुपयांचा कर थकीत आहे. तो वसूल न होण्यामागे अनधिकृत बांधकाम हे मुख्य कारण आहे. मूळ मालमत्तेला लागून अनधिकृतपणे वाढीव बांधकामे केली आहेत. पालिकेने मूळ मिळकत सोडून वाढीव बांधकामांना शास्ती कर लावला आहे. यामुळे मूळ कर आणि शास्ती थकीत ठेवण्याकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. आजअखेर शहरात 97 हजार 777 अनधिकृत बांधकामे आहेत. यामध्ये निवासी, बिगरनिवासी, कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल आदी मिळकतींचा समावेश आहे. मध्यंतरी राज्य सरकारने सरसकट शास्ती कर माफ करण्याची घोषणा केल्यामुळे पालिकेच्या वसुली यंत्रणेला पुन्हा अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शास्ती कराची नियमानुसार समायोजन प्रक्रिया सुरू असताना मूळ कर भरण्यास नकार दिला जात आहे. अशा मालमत्ता धारकांची यादी तयार करण्यात आली आहे. पालिकेच्या 17 विभागीय कर संकलन विभागांतर्गत एकूण 8 हजार 836 मिळकती आढळून आल्या आहेत. त्यांना कर जमा करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तरीही हे मिळकतधारकांनी कर न भरल्याने जप्तीची मोहीम हाती घेतली असता काही मिळकत धारकांनी कर भरला. अशांची संख्या वगळता उर्वरीत 5 हजार 999 मिळकतींवर जप्तीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतरही काहीजणांनी कर भरणा केल्यामुळे उर्वरीत 3 हजार 309 मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यापोटी पालिकेला 46 कोटी 99 लाख तीन हजार 585 रुपयांचा कर वसूल करण्यात यश आले आहे.
मालमत्ता व थकबाकी
थकबाकी असलेल्या
मिळकती 1 लाख 186
एकूण थकबाकी 305 कोटी 69 लाख 75 हजार
निवासी मिळकती 84 हजार 557
थकीत कर 168 कोटी
48 लाख 8,143
बिगर निवासी मिळकती
12 हजार 973
थकीत कर 87 कोटी
78 हजार 427
औद्योगिक मिळकती 392
थकीत कर 10 कोटी
57 लाख 67 हजार 339
मोकळे भूखंड 2,222
थकीत कर 39 कोटी
54 लाख 16 हजार 829