पिंपरी -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत पुणे शहर आणि ग्रामीण पट्ट्यात उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता पीएमआरडीएने दक्षिण कोरिया येथील बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनसोबत (साउथ कोरिया) करारनामा केला आहे. या सामंजस्य करारनाम्यावर नुकतीच स्वाक्षरी झाल्याने शहराच्या पायाभूत विकासाला चालणा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सामंजस्य करारानुसार परस्पर हितसंबंध आणि विशेष कौशल्य असणाऱ्या क्षेत्रांमध्ये तसेच इतर सामाजीक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्यात सुलभता येणार आहे. माहितीची परस्पर देवाणघेवाण केली जाणार आहे. माहिती, समानता, परस्पर लाभ आणि सहाकार्याच्या तत्वांनुसार पथदर्शी प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्याचबरोबर याच संकल्पनेवर आधारित प्रत्यक्ष योजनेची कल्पना व त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ घेता यावा.
सामंजस्य करारनामा प्रक्रिया प्रत्यक्ष पार पाडण्यासाठी बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष किम आणि पालिका नियोजन विभाग, कॉम्प्लेक्स बिझनेस विभागातील काही अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पीएमआरडीएला भेट दिली. सामंजस्य करारावर पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल आणि बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष किम यांनी स्वाक्षरी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात कार्यरत असलेली सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्क ही संस्था या दोन्ही पुणे आणि बुसान यांच्यामधील सामंजस्य कराराची समन्वय संस्था म्हणून काम करेल, असे निश्चित करण्यात आले.
प्रकल्पांचे सादरीकरण
माण-हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणारी पुणे मेट्रो लाइन 3, रिंगरोड प्रकल्प, पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र प्रकल्प आणि भोसरी जिल्हा केंद्र यासारख्या विविध प्रकल्पांचे प्रतिनिधींसमक्ष सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे, बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनच्या प्रतिनिधींनी त्यांनी मार्गी लावलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली.