पिंपरी, दि. 15 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावरील हॅंगिंग कुंड्यांमधील झाडे पाण्यावाचून सुकायला लागल्याबाबत “दै. प्रभात”ने दि.14 नोव्हेंबरच्या अंकात टांगलेल्या रोपांचा जीव टांगणीला असे वृत्त दिले होते. या वृत्ताची दखल महापालिका प्रशासनाने तत्काळ घेऊन सुकालेली रोपे काढून त्या ठिकाणी नवीन रोपे लावली आहेत.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध महत्वाच्या रस्त्यांवर, चौकात हॅंगिंग कुंड्या उभारून यामध्ये विविध शोभिवंत झाडे लावली आहेत. या झाडांना पाणी देणे हे पालिकेच्या उद्यान विभागाचे काम आहे. मात्र, उद्यान विभागाच्या गलथान कारभारामुळे महापालिका आयुक्त सिंह यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावरील झाडे पाण्यावाचून सुकायला लागली होती. आयुक्तांच्या बंगल्यासमोरील काही झाडांना वेळेच्या वेळी पाणी देण्यात येते तर बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या हॅंगिंग कुंड्यांकडे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दै. प्रभातने पालिका प्रशासनाच्या निदर्शास आणून दिले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या उद्यान विभागाने मंगळवार (दि.15) रोजी हॅंगिंग कुंड्यातील सुकलेली रोपे काढून नवीन रोपे बसविली आहेत.