- सात दिवसांपासून सारखीच संख्या
- प्रशासनाचा बेजबाबदारपणा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने अक्षरश: हाहाकार निर्माण झालेला असताना तसेच रोजच मृत्यूचे प्रमाण वाढत असताना महापालिका प्रशासनाकडून मात्र आकडेवारीत गोलमाल सुरू आहे. गेल्या सात दिवसांपासून मृत्यूची आकडेवारी एकसारखी असून हा बेजबाबदारपणा की आणखी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फेब्रुवारी 2021 च्या मध्यापासून शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मार्चच्या मध्यापासून शहरात करोना रुग्णांची दैनंदिन दोन हजारांहून अधिक संख्या वाढत आहे. तर गंभीर रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. सध्या शहरात 25 हजार 566 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये शहरातील रुग्णांची संख्या 23 हजार 602 इतकी असून शहराबाहेरील 1964 नागरिक महापालिकेच्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरातील एकूण रुग्णांपैकी 15 हजार 348 इतके रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर 8 हजार 254 रुग्णांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
महापालिकेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे नव्याने बाधित, करोनामुक्त आणि करोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी रोज प्रसिद्ध करण्यात येते. या आकडेवारीनुसार गेल्या सात दिवसांत म्हणजेच 16 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीदरम्यान शहरात रोजच 54 मृत्यू होत असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. केवळ 21 एप्रिल रोजी एका अंकाने आकडेवारीमध्ये बदल करण्यात आला आहे. 16 ते 22 एप्रिल दरम्यान रोजच शहरातील 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दर्शविण्यात आले आहे तर याच कालावधीत शहराबाहेरील 22 रुग्णांचा दैनंदिन मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 21 एप्रिल रोजी शहराबाहेरील 23 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या माहितीबाबत प्रशासनाला गांभीर्य नाही, केवळ कॉपी पेस्टचे प्रसिद्धीपत्रक काढण्यात येते की मृत्यूची आकडेवारी लपविली जाते? असा प्रश्न यामुळे समोर आला आहे. करोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना अद्यापही प्रशासनाला गांभीर्यच नसल्याचेही समोर आले आहे.
मागील म्हणजे नेमके कधीचे ?
महापालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात रोज 54 मृत्यू दाखविले जातात आणि खाली टीप लिहिली जाते की आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. महापालिका रोज या तळटीपमध्ये मागील 24 तासांत 12 ते 18च मृत्यू असल्याचे सांगते. असे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. यामुळे मागील मृत्यू म्हणजे नेमके कधीचे मृत्यू हेच कळेनासे झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पालिका करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी ठीक करु शकत नाही. रोजच मागील मृत्यू सांगून परिस्थितीचे गांभीर्य कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा रुग्णालयात 25 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात गुरूवारी (दि. 22) 25 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, एका ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात सध्या 79 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 58 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान पिंपळे निलख येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्या 13 रुग्णांमध्ये 6 पुरुष व 7 महिला रुग्णांचा समावेश आहे. पिंपळे गुरव, पाषाण, औंध, सांगवी, वडगावशेरी येथील हे रहिवाशी आहेत. पुणे येथील एका करोना संशयित रुग्णाला आज उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातून आत्तापर्यंत 1 हजार 460 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. 1 हजार 714 रुग्णांना होम क्वारंटाईन केले आहे.