पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार रिक्त पदांवर सुरू आहे. सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आदी पदांची आवश्यकता आहे. पदे रिक्त असल्याने एकावर दोन कामे करण्याची वेळ येत आहे. ही रिक्त पदे भरण्याबाबत आरोग्य विभागाने महापालिका प्रशासनाला पत्र देखील दिले आहे. त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही.
प्लॅस्टिक कारवाई कंटेनर सर्वे, विविध योजनांचा पाठपुरावा, प्रभागातील साफसफाईचे नियोजन करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. प्रभागनिहाय घरोघरी जाऊन कंटेनर सर्वे केला जात आहे. त्यामध्ये डेंग्यूच्या बाबत अहवाल तयार करून महापालिकेला पाठविला जात आहे. तसेच रस्ता सफाईचे नियोजन केले जात आहे. कर्मचाऱ्यांना कामाची विभागणी करून दिली जात आहे. यासाठी आरोग्य विभागाला सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, मलेरिया इन्स्पेक्टर, आरोग्य निरीक्षक आदी पदांची आवश्यकता आहे. ही पदे रिक्त असल्याने आरोग्य विभागाच्या कामाचे नियोजन विस्कळीत होत आहे. तसेच एका अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार दिला जात आहे. ही रिक्त पदे भरावे, यासाठी आरोग्य विभाग वारंवार अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करत आहे. मात्र रिक्त पदे भरण्याबाबत अद्याप महापालिका प्रशासनाने कार्यवाही केली नाही.
सध्या आम्हाला तातडीने सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, मलेरिया इन्स्पेक्टर, आरोग्य निरीक्षक ही पदे भरणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही पत्र व्यवहार केला आहे. यासहवर्षभरात जे अधिकारी निवृत्त होणार आहेत त्यांच्यासह पदे भरण्याबाबत पत्रव्यहार केला आहे.
– गणेश देशपांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका.
आरोग्य अधिकाऱ्यांची 12 पदे आवश्यक
सहायक आरोग्य अधिकाऱ्यांची सध्या 4 पदे रिक्त आहेत. तीन क्षेत्रीय कार्यालयांसह मुख्य कार्यालयात एका सहायक आरोग्य अधिकाऱ्यांची गरज आहे. तसेच एका वर्षात आणखी सहायक आरोग्य अधिकारी निवृत्त होणार आहेत. त्याचा विचार करता 12 रिक्त पदे भरावीत, असे पत्र आरोग्य विभागाने प्रशासनाला दिले आहे.
तातडीने आवश्यक पदे
मलेरिया इन्स्पेक्टर – 04
मुख्य आरोग्य निरीक्षक – 04
आरोग्य निरीक्षक – 10