पिंपरी, दि. 14 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवाळीची भेटवस्तू स्वीकारु नये. जे अधिकारी व कर्मचारी भेटवस्तू घेताना आढळतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा दरवर्षी दिवाळीत महापालिका आयुक्त आदेश काढतात. मात्र हे आदेश म्हणजे केवळ कागदी घोडे नाचविण्याची औपचारिकताच आहे. गेल्या दहा वर्षांत एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली नाही.
महापालिका भवनामध्ये दिवाळीनिमित्त ठेकेदार, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा, भेटी-गाठीसाठी येतात. सुकामेव्याचे बॉक्स, मिठाई, शुभेच्छापत्रे, शोभेच्या, घरगुती वापराच्या भेटवस्तू, मॉलमध्ये खरेदीसाठीचे कूपन्स देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. परंतु, महापालिका अधिकाऱ्यांनी महापालिकेत अशा प्रकारे भेटवस्तू वाटपास मनाई आहे. प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील कलम 12 नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कोणतीही देणगी (भेटवस्तू) स्वतः स्वीकारता कामा नये. अथवा त्याच्या कोणत्याही कुटुंबीयाला किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देता कामा नये, असा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी गुरूवार (दि.13) रोजी जारी केला आहे.
महापालिका आयुक्त दरवर्षी दिवाळीत भेटवस्तू न घेण्याबाबत आदेश काढत असले तरी अनेक अधिकारी, कर्मचारी भेटवस्तू स्विकारतातच, हे उघड गुपित आहे. त्यामुळे फक्त आदेश काढून महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर या बाबींची प्रत्यक्षात कठोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. दिवाळीत एखाद्याने भेटवस्तू आणल्यास संबंधित व्यक्तीला पालिकेच्या प्रवेशव्दारावरच अडविले जाते, असा सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर गेल्या दहा वर्षांत एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यावर भेटवस्तू घेतल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई केल्याचे एकही उदाहण नसल्याचे प्रशासन विभागातील सुत्रांनी सांगितले.
भेटवस्तू घेण्यासाठी पळवाटा
महापालिका आयुक्तांनी दिवाळीत भेटवस्तू घेऊ नका, असे कितीही सांगितले किंवा आदेश काढले त्यानंतरही अधिकारी, कर्मचारी भेटवस्तू घेण्यासाठी विविध पळवाटा शोधत आहेत. दिवाळी सणाला अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. अधिकारी, कर्मचारी भेट वस्तू घेण्यासाठी आपल्या मोटारीचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी मोटारी घेऊन येत आहेत. महापालिका आवारात मोटारीची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आवारातील पार्किंग कर्मचाऱ्यांच्याच मोटारीने भरुन जाते. तर अनेक कर्मचारी बाहेरील दोन्ही कडच्या रस्त्यावर लांब-लांबपर्यंत पार्किंग करत आहेत. यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. एखादा ठेकेदार अथवा इतर कोणी भेटवस्तू आणली की आपल्या कर्मचाऱ्याच्यामार्फत भेटवस्तू मोटारीत ठेवण्याची तजवीज अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत.