पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिकेने रुग्णालयामधील आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पालिका रुग्णालयातील अग्निशमन व विद्युत उपकरणांची नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित देखील केले जाणार आहे. पालिका विद्युत विभागाने नियमित हा आराखडा तयार केला असून आगीच्या घटना रोखण्यास मदत होईल, असा दावा अधिकाऱ्यांचा आहे.
शहरात पालिकेचे 8 मोठी रूग्णालये, 28 दवाखाने आणि 20 आरोग्य सेवा केंद्र आहेत. महापालिकेच्या तालेरा रुग्णालयामध्ये 21 मे 2022 ला आग लागली होती. रुग्णालयामध्ये सकाळपासून जनरेटर सुरू असल्याने बॅटऱ्या तापून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला होता. त्यानंतर आगीची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना केली. मात्र, या समितीचा अहवाल अद्याप प्रशासनाला प्राप्त झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भविष्यात रुग्णालयामध्ये आग लागण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. महापालिका रुग्णालयांमधील विद्युत व अग्निशामक उपकरणांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे.
कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्या नियंत्रणातील तांत्रिक कर्मचारी यांच्यासोबत समक्ष उपकरणांची पडताळणी करावी. त्याचा तपासणी अहवाल विद्युत विभागाचे सहशहर अभियंता यांच्याकडे द्यावा लागणार आहे. रुग्णालयामध्ये आग लागल्यावर काय उपाय योजना कराव्यात, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी रुग्णालयामध्ये आग लागल्यास काय करावे व काय करू नये, यासाठी मॉकड्रील होईल. या माध्यमातून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या माध्यमातून रुग्णालयातील आग लागण्याच्या घटना आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे.
कोणत्या उपकरणांची होणार पडताळणी?
क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या विविध रुग्णालय इमारतींमध्ये असणारी विद्युत उपकरणे, त्या उपकरणांची असणारी स्थिती तपासण्यात येईल. ती वापरण्यायोग्य आहेत किंवा नाही याची लेखी नोंद करावी लागेल. तसेच, विद्युत वायरींचे काही ठिकाणी असणारे जाळे, वायरींची स्थिती, अर्थिंग तपासणी, स्वीच गिअर, कंट्रोल पॅनल याची पडताळणी करण्यात येणार आहे.