- करोनायोद्धांसमोर संकट : करोनामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे चार हजार पोलिसांचे संख्याबळ आहे. त्यापैकी सुमारे दहा टक्के पोलिसांना अर्थात करोनायोद्धांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये 380 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी सुमारे सव्वा तीनशे कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केली आहे. तर या आजारामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सध्या 53 जणांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर 23 जणांचे घरात विलगीकरण करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 19 मार्च पासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश लागू केल्याने तब्बल 80 ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीत पोलिसांचा नागरिकांशी थेट संपर्क येत होता. सुरुवातीच्या काळात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त करावा लागत होता. करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या चिंचवडमधील आनंदनगर परिसरात दोनवेळा नागरिकांचा उद्रेक झाला होता. यामुळे पोलिसांवरील करोनाचा धोका आणखीनच वाढत चालला होता.
सध्या हे बंदोबस्त बंद करण्यात आले आहेत. मात्र पोलिसांना करोनाची लागण होऊ नये म्हणून पोलीस अधिकारी पुरेपूर प्रयत्न करीत होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनेटायझर, हॅन्डग्लोज, फेस शिल्ड, तसेच प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या विविध औषधांचा पुरवठा केला जाता होता. एखाद्या कर्मचाऱ्यास लक्षण दिसून आल्यास त्याची त्वरीत तपासणी करून आवश्यकता भासल्यास त्यास रुग्णालयात दाखलही करण्यात येत होते.
सध्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख इतकी आहे. त्यापैकी दहा टक्के नागरिकांची करोना तपासणी झाली आहे. त्यातून सुमारे दोन टक्के नागरिक करोनाबाधित झाले आहेत. मात्र करोना योद्धा असलेले पोलीस विविध कारणांमुळे थेट करोना बाधितांच्या संपर्कात येत असल्याने पोलीस बळाच्या तब्बल दहा टक्के पोलीस कर्मचारी आत्तापर्यंत बाधित झाले आहेत. वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील बहुतांश भाग हा उच्चभ्रू वस्तीत मोडणारा आहे. या भागातील सुशिक्षित नागरिक आपल्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात काळजी घेतात. तरीदेखील या पोलीस ठाण्यातील करोना बाधितांची संख्या जादा आहे.
वाकड पोलीस ठाण्यात सर्वाधिक बाधित
वाकड पोलीस ठाण्यातील 31 तर हिंजवडी पोलीस ठाण्यातील 26 जण करोना बाधित झाले आहेत. पोलिसांच्या विविध 42 शाखांमधील कर्मचारी आत्तापर्यंत बाधित झाले आहेत. तर वाहतूक शाखेतील चाकण येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्यांमध्ये 40 पोलीस अधिकारी असून, 340 कर्मचारी आहेत. आतापर्यंत 303 कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केली आहे. तर सध्या 53 जणांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर 23 जणांचे घरात विलगीकरण करण्यात आले आहे.
एक पोलीस अधिकारी दोनदा बाधित
पोलीस आयुक्तालयात काम करणाऱ्या एक पोलीस अधिकाऱ्याचा सुरवातीच्या काळात करोना बाधित असल्याचा अहवाल आल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्यात करोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. काही दिवसांनी त्या अधिकाऱ्याचे वडिल बाधित आले. वडिलांच्या संपर्कात आल्याने त्या अधिकाऱ्यामध्ये करोनाची लक्षणे दिसू लागली. त्यांनी आपली तपासणी केली असता पुन्हा ते करोना बाधित असल्याचे निदर्शनास आले.