पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे १८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आढळले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये १४ रुग्णांवर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. तर उर्वरीत चार रुग्णांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार असणाऱ्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा, असे आवाहन वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक १८ रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेच्या रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह सर्व तयारी आहे. मात्र, सध्याच्या कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळत आहे.
त्यामुळे काळजीचे कारण नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेऊन चाचणीही करण्यात येत आहे. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार आहेत, त्यांनी स्वतःहून गर्दीच्या – ठिकाणी जाताना मास्क वापरावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. सॅनिटायझरचा वापर करावा. सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सदा, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.
महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. नव्या रुग्णांमध्ये नवीन व्हेरियंट आढळलेला नाही. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. मात्र, पुन्हा रुग्ण आढळत असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. महापालिकेच्या वतीने वायसीएम, थेरगाव, भोसरी, जिजामाता रुग्णालयामध्ये बेड, ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. औषधांचाही पुरेसा साठा आहे.