पुणे – फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब तर्फे आयोजित पहिल्या फिनिक्स् करंडक अजिंक्यपद प्रौढ गट टी-20 क्रिकेट स्पर्धेत न्युट्रीलिशियस् इलेव्हन आणि बीकेसी क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला.
सहकारनगर येथील ल. रा .शिंदे हायस्कूल मैदान आणि स्केल-अप मैदान, वारजे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अजित पाटील याच्या नाबाद 66 धावांच्या जोरावर न्युट्रीलिशियस् इलेव्हन संघाने फ्रेन्डस् क्रिकेट क्लबचा 7 गडी राखून सहज पराभव केला. फ्रेन्डस् क्रिकेट क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना 161 धावांचे आव्हान उभे केले. किरण मेने (36 धावा) आणि अरविंद चौहान (22 धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. हे आव्हान न्युट्रीलिशियस् इलेव्हनने 18.1 षटकात व 3 गडी गमावून पूर्ण केले. अजित पाटील याने नाबाद 66 धावा, राहूल कामठे (43 धावा) आणि अतुल भागवत (नाबाद 25 धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा विजय साकार केला.
अभिषेक मोहीते याच्या 93 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर बीकेसी क्लब संघाने फोनिक्स् क्रिकेट क्लबचा 95 धावांनी सहज पराभव केला. बीकेसी क्लबने 211 धावांचा डोंगर उभा केला. अभिषेक मोहीते याने 59 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांसह 93 धावांची खेळी केली. त्याला दुसऱ्या बाजूने गोरक्क्ष जाधव (38 धावा), सुधीर साठे (20 धावा) आणि महेश दिवटे (22 धावा) यांनी योग्य साथ दिली. या लक्ष्यासमोर फोनिक्स् क्रिकेट क्लबचा डाव 116 धावांवर मर्यादित राहीला.