चिखली – सामाजिक कार्यासाठी नीलेश नेवाळे यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांच्या कार्यामुळे परिसरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. व्यवसाय क्षेत्रातही त्यांचे मोठे नाव आहे. नेवाळे यांच्या कार्यातून दातृत्वभाव आणि समाजाप्रती कनवळा दिसतो, असे गौरवोद्गार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी काढले.
चिखली, पूर्णानगर, शनिमंदिर येथील मैदानावर आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाराष्ट्राचे हास्यवीर या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हास्यजत्रा फेम गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब यांनी हास्याचे फवारे उडवत मनोरंजन केले.
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी उपमहापौर शरद बोर्हाडे, भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, महिला अध्यक्षा सुजाता पालांडे, कामगार नेते विष्णुपंत नेवाळे, माजी नगरसेवक नारायण बहिरवडे, सुजित पाटील, कार्तिक लांडगे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कविता हिंगे, सोनम मोरे, गौरी नेवाळे, प्रिया नेवाळे, श्रेया नेवाळे उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले, भोसरी परिसरात कामगार, कष्टकरी वर्गासह सर्व सामाजिक स्थरातील लोक वास्तव्यास आहेत. त्यांचा विकास करणे, गरजा, अपेक्षा पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडत आहोत. माझ्या संघर्षाच्या काळात जे माझा आधार होते, त्यापैकी एक विष्णुपंत नेवाळे हे आहेत, असेही ते म्हणाले.
नीलेश नेवाळे म्हणाले, आपल्या कर्तृत्व आणि दातृत्वाने लोकांच्या, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आमदार म्हणजे महेशदादा लांडगे आहेत. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना व्हिजन 2020 च्या माध्यमातून दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. त्यांना जनतेनी महापालिकेत कारभारी म्हणून कौल दिला. त्यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यांच्यामुळेच समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न सुटला, सर्वांगीण विकास झाला आहे.