पेट्रोल, डीझेल दरांची गगनभरारी ! विमान इंधनाच्या तुलनेत 30 टक्‍क्‍यांनी महाग

नवी दिल्ली  -पेट्रोल, डीझेल दरांची गगनभरारी सुरूच आहे. त्यामुळे वाहनांसाठी लागणारी ती इंधने विमान इंधनाच्या (एटीएफ) तुलनेत 30 टक्‍क्‍यांनी महागली आहेत.

सार्वजनिक इंधन कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी रविवारी पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत लिटरमागे प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलचे दर अनुक्रमे 105 रूपये 84 पैसे आणि 111 रूपये 77 पैसे इतके झाले. तर डीझेलचे दर अनुक्रमे 94.57 रूपयांवर आणि 102.52 रूपयांवर पोहचले.

त्यामुळे पेट्रोलचा दर विमान इंधन दरापेक्षा 33 टक्के अधिक झाला आहे. दिल्लीत विमान इंधनाचा दर लिटरमागे 79 रूपये आहे. इंधन दरवाढीच्या सत्रामुळे पेट्रोल दराने सर्व राज्यांच्या राजधानींमध्ये 100 रूपयांची पातळी ओलांडली आहे. तर, डझनभर राज्यांत डीझेल दरानेही तो टप्पा गाठला आहे. संपूर्ण देशाचा विचार करता राजस्थानच्या गंगानगरमध्ये इंधनांचे दर सर्वांधिक आहेत. त्या शहरात प्रतिलिटर पेट्रोलसाठी 117 रूपये 86 पैसे, तर डीझेलसाठी 105 रूपये 95 पैसे मोजावे लागत आहेत.

सुमारे तीन आठवड्यांच्या विश्रामानंतर सार्वजनिक कंपन्यांनी सप्टेंबर महिन्यातील अखेरच्या आठवड्यापासून पुन्हा दरवाढीचे सत्र सुरू केले. तेव्हापासून पेट्रोलच्या दरात 16 वेळा, तर डीझेलच्या दरात 19 वेळा वाढ झाली आहे. त्या वाढींमध्ये मिळून डीझेल सुमारे 6 रूपयांनी, तर पेट्रोल 4.65 रूपयांनी महागले आहे. त्याआधी चालू वर्षातील 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोल दरात 11 रूपये 44 पैशांनी वाढ झाली. तेवढ्या कालावधीत डीझेल 9 रूपये 14 पैशांनी महागले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचे दर गगनाला भिडल्याने भारतात पेट्रोल आणि डीझेलचे दर नवनवे उच्चांक गाठत आहेत. भारताला इंधन गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून रहावे लागते. महिनाभरापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनांचे दर प्रतिपिंपामागे 73.51 डॉलर्स इतके होते. आता ते 84 डॉलर्सवर गेले आहेत. सात वर्षांतील तो उच्चांक आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.